गौरी लंकेश यांचे मारेकरी आपल्या हत्येचा कट रचत असल्याच्या वृत्तावर बोलताना अभिनेता प्रकाश राज यांनी आता आपला आवाज अजून भक्कम होईल असं म्हटलं आहे. विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली वृत्तपत्रातील बातमी प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. या बातमीत गौरी लंकेश यांचे मारेकरी प्रकाश राज यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकाश राज यांनी यावरुन आपलं मत मांडत संताप व्यक्त केला आहे.

‘बंगळुरु – गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी प्रकाश राज यांच्या हत्येचा प्लान केला होता असं एसआयटी तपासात समोर आलं आहे. माझा आवाज आता अजून बुलंद होणार आहे. या द्वेषाच्या राजकारणाने तुम्ही पळ काढण्यात यशस्वी व्हाल असं तुम्हाला वाटतं’, असं प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एका कन्नड वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जाहीरपणे टीका केल्यानंतर गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता. रिपोर्टनुसार, मारेकऱ्यांनी गिरीश कर्नाड यांच्याही हत्येचा कट रचला होता. ज्याला त्यांनी ‘ऑपरेशन काका’ असं नाव दिलं होतं.