जुन्या दिल्लीच्या कोटगढ भागातील एका सधन पंजाबी कुटुंबात १९२० साली जन्मलेल्या प्राणकिशन सिकंद यांनी ४० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्या काळात लाहोर हे चित्रपटनिर्मितीचे प्रमुख केंद्र होते. एके काळी सौंदर्य व गायनाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री नूरजहान हिचा नायक म्हणून त्यांनी १९४२ साली ‘खानदान’ या चित्रपटात सर्वप्रथम अभिनय केला. त्यानंतर ‘यमला जट’ या पंजाबी चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका गाजली. तसेच ‘चौधरी’, ‘खजांची’ आदी लाहोरच्या १७ चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. फाळणीनंतर ते मुंबईला आले व बॉम्बे टॉकीजच्या ‘जिम्द्दी’ (१९४८) या चित्रपटाने त्यांना मुंबईच्या चित्रपटसृष्टीची दारे खुली झाली. देव आनंद व कामिनी कौशल या जोडीबरोबर ‘ज़िद्दी’ने प्राणलाही लोकप्रियता मिळाली. त्यानंतर गृहस्थी, अपराधी हे चित्रपट त्यांना मिळाले. तथापि, पन्नासच्या दशकातील अफसानामधील भमिकेने त्यांच्यावर खलनायकीचा ठसा उमटला जो पुढे पंधरा वर्षे कायम राहिला. दिलीप कुमार बरोबर आझाद, मधुमती, देवदास, दिल दिया दर्द लिया, आदमी, राज कपूरबरोबर दिल ही तो है, जिस देश में गंगा बहती है, देव आनंदबरोबर मुनीमजी, जब प्यार किसी से होता है, शम्मी कपूरबरोबर कश्मीर की कली, अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस, ब्रम्हचारी या त्याच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या. तसेच जंगल में मंगलमधील स्त्री भूमिकाही त्यांनी बहारदारपणे वठवली. स्वत: प्राणला केंद्रस्थानी ठेवून निर्मिती करण्यात आलेले पिलपिली साहेब आणि हलाकू हे चित्रपटही गाजले. किशोर कुमार व मधुबाला या जोडीच्या हाफ टिकटमधील प्राणचा विनोदी ढंगाचा खलनायकही गाजला. प्राणचा खलनायक एवढा भेदक होता की त्या काळात कोणी आपल्या मुलाचे नाव प्राण असे ठेवण्यास धजावत नसत, अशी गंमतीशीर आठवण प्राण देतात.  साठच्या दशकाच्या अखेरीस मनोज कुमारच्या ‘उपकार’ने प्राणला नवसंजीवनी दिली. या चित्रपटातील त्याचा ‘मलंगचाचा’ एवढा गाजला की प्रेक्षकांनी त्याला सहृदयी चरित्र अभिनेता म्हणून मनोमन स्वीकारले. त्यानंतर सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी रंगवल्या.

प्राण यांचे गाजलेले चित्रपट
यमला जट (१९४०), बरसात की एक राज (१९४८), जिद्दी (१९४८), आह (१९५३), बडी बहू (१९५४), आझाद (१९५५), देवदास (१९५५), मुनीमजी (१९५५), चोरी चोरी (१९५६), हलाकू (१९५६), मधुमती (१९५८), छलिया (१९६०), जिस देश में गंगा बेहेती है (१९६०), हाफ तिकीट (१९६०), काश्मिर की कली (१९६४), गुमनाम (१९६५), उपकार (१९६७), पत्थर के सनम (१९६७), राम और शाम (१९६७), जॉनी मेरा नाम (१९७०), जंजीर (१९७३), बॉबी (१९७३), अमर अकबर अ‍ॅन्थनी (१९७७), राजा और राणा (१९८४)

हा आमचा सन्मान !
सुनील सिकंद (पुत्र) – सिनेमाच्या शतसांवत्सरिक वर्षांत दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला याचा खूप आनंद झाला. हा आमचा सन्मान आहे. आता माझे वडील टीव्हीवर आपल्याला पुरस्कार मिळाल्याचे वृत्त पाहत बसले आहेत. हा मानाचा पुरस्कार उशीरा जाहीर झाला वगैरे यात आम्हाला पडायचे नाही. पुरस्कार जाहीर झाला याचा आम्हा सर्व कुटुंबियांना आनंद झालाय हे खरे.
प्रेम चोप्रा- ही खूप मोठी बातमी आहे. फाळके पुरस्कार प्राण यांना मिळायलाच हवा होता. परंतु, तो त्यांना खूप आधीच मिळाला असता तर अधिक आनंद वाटला असता. पण पुरस्कारांच्या बाबतीत उशीर कधीच होत नाही, असे म्हणायला हवे. अनेक कलावंतांना तसेच बॉलिवूडमधील अनेक लोकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण सिनेमासृष्टीतीला ललामभूत ठरेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आणि सिनेकारकीर्द आहे.
ऋषी कपूर- अखेर प्राण यांना फाळके पुरस्कार मिळाला याचा खूपच आनंद आहे. त्यांच्यासोबत कर्ज, नसीब, बॉबी यांसारख्या चित्रपटांतून काम केले होते. काही वर्षांपूर्वीच खरे तर हा पुरस्कार त्यांना द्यायला हवा होता. असो. त्यांना खलनायक म्हणून पाहतपाहत मी मोठा झालो हे खरे. परंतु, ते तर हीरो आहेत. ‘आ अब लौट चले’ या आपण दिग्दर्शन केलेल्या पहिल्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती, परंतु, काही कारणाने ते जमू शकले नाही याची खंत वाटते.
महेश भट – एकेकाळी सगळ्या वाईट गोष्टींचा नमुना म्हणजे प्राण असे समीकरण झाले होते इतके समरसून त्यांनी खलनायकी व्यक्तिरेखा रंगविल्या. त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ते बडे अभिनेते म्हणून आम्ही सर्वानी त्यांना पाहिले आहे. खलनायक रंगवून प्रेक्षकांच्या मनात राग उत्पन्न करणारे हे बुजूर्ग व्यक्तिमत्व वास्तव जीवनात मात्र अतिशय उत्तम माणूस आहेत.
अनुपम खेर – प्राणसाहेब यांना अखेर मानाचा समजला जाणार हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला याचा निश्चितच खूप आनंद झाला. पण खरे तर मनातून प्राणसाहेब मी तुमचे २० वर्षांपूर्वीच अभिनंदन केले आहे.
मधुर भांडारकर – अभिनंदन प्राण साहेब. या पुरस्काराचे तुम्हीच खरे मानकरी आहात.
दिग्दर्शक कुणाल कोहली – प्राण यांचा इतका दबदबा निर्माण झाला होता की मूल जन्माला आल्यानंतर कोणी त्याचे नाव प्राण ठेवत नसत. मनोजकुमार यांनी त्यांच्या प्रतिमेला छेद देऊन प्राणसाहेबांना उपकार या चित्रपटात सकारात्मक चरित्र भूमिका दिली आणि त्याचेही प्राणसाहेबांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर सोने केले.