पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राजकीय टीका
विधानसभा अध्यक्षपद भूषविणाऱ्या व्यक्तीने राजकीय वक्तव्ये करू नयेत, असे संसदीय संकेत असताना आसाम विधानसभेचे अध्यक्ष प्रणवकुमार गोगोई यांनी मात्र ते धुडकावून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. मोदी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याने येत्या निवडणुकीत आसामी जनता भाजपला धडा शिकवेल, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.
केंद्रीय आर्थिक धोरणांना विरोध करणारा ठराव आसामच्या विधिमंडळात संमत करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मोदी यांची वेळ मागितली आहे. परंतु, आपल्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार काँग्रेससह आसाम गण परिषद व इतर पक्षांकडून केली जात आहे. त्याच पाश्र्वभूमीवर गोगोई यांनी मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असे वक्तव्य त्यांनी अध्यक्षाच्या खुर्चीवरून केले. यावेळी राज्याचे विकास व नियोजनमंत्री अजंता नेओग यांच्या भाषणात अडथळे आणल्याबद्दल त्यांनी भाजपचे विधिमंडळ पक्षाचे नेते जादव चंद्रा डेका यांच्यावरही संताप व्यक्त केला. सभागृहात पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागू नका, अशा शब्दांत त्यांनी डेका यांना खडसावले. केंद्रीय धोरणांतील बदलांमुळे आसामला सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याची माहिती नेओग यांनी सभागृहाला दिली. यावेळी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी यांच्या निवासस्थानासमोर धरणे धरावे का, अशी विचारणा आमदारांनी गोगोई यांना केली.
त्यावर सदस्यांच्या हक्कांसाठी आपण कुणासमोरही हात पसरणार नसल्याचे त्यांनी उत्तर दिले.
जेटली यांना भेटण्यास नकार
बदललेल्या केंद्रीय धोरणांचा आसामला होणाऱ्या तोटय़ाबद्दल चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या आमदारांशी चर्चा करण्यास तयारी दर्शविली आहे. परंतु, यासंदर्भात आपल्याला पंतप्रधानांचीच भेट हवी असल्याचे गोगोई यांनी स्पष्ट केले. मोदींकडून आसामच्या आमदारांचा वारंवार पाणउतारा होत असल्याची भावना यावेळी आसाम गण परिषदेचे आमदार फणिभूषण चौधरी यांनी व्यक्त केली.