आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत भारताचा आणि भारतीयांचा आवाज पोहोचविण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक प्रसारण यंत्रणा अर्थात प्रसारभारतीने युरोपीय बाजारपेठेत उडी घ्यायचे ठरविले आहे. काळाबरोबर आपणही बदलले पाहिजे आणि त्यानुसार बाजारपेठेतील सर्वोत्तमांचे सहकार्य घेत भारताचा आणि भारतीयांचा आवाज जगभरात पोहोचवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार यांनी व्यक्त केली. तसेच सरकारविरोधीही नाही आणि सरकारसमर्थकही नाही अशा प्रसारभारतीला प्रशासकीय तसेच आर्थिकदृष्टय़ा अधिकाधिक स्वायत्तता मिळणे गरजेचे आहे आणि सरकारही त्यासाठी अनुकूल होत आहे, अशी माहितीही सिरकार यांनी दिली.
येथे सोमवारपासून सुरू झालेल्या तीनदिवसीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी सिरकार येथे आले आहेत. ‘पत्रकारितेचे भविष्य व आंतरराष्ट्रीय प्रसारण संस्थांच्या भूमिका’ या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते. प्रसारभारती ही सरकारनियंत्रित यंत्रणा असल्याची भावना लोकांमध्ये पसरली आहे, त्यामागे प्रसारभारतीतील अधिकाऱ्यांची नोकरशाही मनोवृत्तीच असल्याची टीकाही त्यांनी केली.
दूरदर्शनसारख्या वाहिन्यांवरही बदल होऊ शकतात मात्र असे बदल स्वीकारण्याची तयारी नागरिकांनीही दाखविणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सिरकार यांनी व्यक्त केली. भारतीय प्रसारण यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही. पण आमच्या समस्या, आमची अस्मिता आणि आमचे मुख्य काम वेगळे आहे.  उभे राष्ट्र एकसंध राखणे हे आमचे काम असल्याचे ते म्हणाले.

प्रसारभारती ही संसदेने कायद्याद्वारे निर्माण केलेली स्वायत्त यंत्रणा आहे. सार्वजनिक दृक् -श्राव्य प्रसारणाचे काम या यंत्रणेमार्फत पार पाडले जाते. या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी तत्त्वत:  तटस्थ राहणे अपेक्षित आहे.