बलात्कारापासून बचावासाठी धावत्या कारमधून उडी घेतल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तेलंगणामध्ये हैदराबाद-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर रावेली गावाजवळ घडली. पोलिसांनी मृत महिलेचे नाव कलावती असल्याचे सांगितले. कलावती आपल्या सात वर्षाच्या मुलीसह घरी परतत असताना ही घटना घडली. कलावती कपडे विकायचे काम करत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुट्टीच्या दिवशी कलावती हैदराबादहून आपल्या घरी निघाली होती. मात्र, शेवटची बस सुटल्यामुळे तिला एका कार चालकाला लिफ्ट मागावी लागली. कलावती आणि तिच्या छोट्या मुलीला एकटे पाहिल्यानंतर कारमध्ये बसलेल्या तरुणांनी तिच्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या कलावतीने कारमधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर कलावतीच्या मुलीलाही त्या तरुणांनी कारमधून उतरवले आणि घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी पीडित महिलेच्या मुलीकडे चौकशी केल्यानंतर चालकासोबत त्याचा एक सहकारीही कारमध्ये असल्याचे समोर आले. कार चालकाने सुरुवातीला कलावतीची छेड काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यातून वाचण्यासाठीच अखेर तिने थेट कारमधून बाहेर उडी घेतली. कलावती ही सात महिन्यांची गर्भवती होती. पोलीस टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा तपास सुरू आहे.