नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव व चौधरी चरणसिंह, कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन आणि बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले क र्पूरी ठाकूर या चौघांना शनिवारी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राव, सिंह, स्वामिनाथन व ठाकूर यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

पी.व्ही. नरसिंह राव हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. ते दूरगामी आर्थिक सुधारणा आणि कौशल्यपूर्ण राजकीय डावपेचांसाठी ओळखले जात. ते दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेहरू- गांधी घराण्याबाहेरचे पहिले काँग्रेस नेते आणि १९९०च्या सुरुवातीच्या अशांत काळातून देशाला पुढे नेणारे व्यक्ती होते. त्यांचे पुत्र प्रभाकर राव यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

हेही वाचा >>> अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध

पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट नेते असलेले चौधरी चरणसिंह हे २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या काळात पंतप्रधान होते. जमीनदारी प्रथेचे निर्मूलन आणि भूसुधारणा यांच्यातील त्यांचे योगदान, तसेच अर्थव्यवस्थेचे- विशेषत: ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेचे- त्यांचे सखोल ज्ञान सर्वज्ञात आहे. त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 एम.एस. स्वामिनाथन यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यात मोठी भूमिका बजावली. सर्वांसाठी अन्नधान्य व पोषाहार हे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण जाहीर केले जाण्याच्या परिवर्तनासाठी ते ओळखले जातात. जगभरातील विद्यापीठांकडून त्यांना ८४ मानद पदव्या मिळाल्या होत्या. त्यांच्या वतीने कन्या नित्या राव यांनी पुरस्कार स्वीकारला.

समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर हे डिसेंबर १९७० ते जून १९७१ आणि डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ या काळात बिहारचे मुख्यमंत्री होते. सामाजिक भेदभाव व असमानता यांच्याविरुद्धच्या लढयातील ते एक प्रमुख नेते होते. साधी राहणी आणि नि:स्वार्थी कृती यांसाठी ते ओळखले जात. त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

‘पुरस्कारातून सरकारच्या बांधिलकीचे दर्शन’

मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या चौघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या चारही महनीय व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव व चौधरी चरणसिंह, कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाण्यातून शेतकरी, दलित मागासवर्गीय लोकांबद्दलची मोदी सरकारची बांधिलकी दिसून येते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.