फ्रान्सवरच्या संकटाचे सावट काही केल्या कमी होत नाही. फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी नीस इथे जमलेल्या जमावावर ट्रक चालवून ट्रक ड्रायव्हरने अनेकांना चिरडले. या हल्ल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी निषेध व्यक्त केला आहे. हा हल्ला दहशतवादी हल्ल्यापेक्षा कमी नाही, दहशतवाद्यांच्या धमक्यांना यापुढे फ्रान्स भीक घालणार नाही आणि लवकरच दहशतवादाचा बिमोड करू, असेही ओलांद म्हणाले.
या हल्ल्यानंतर ओलांद यांनी आणीबाणी घोषित केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्समध्ये आणीबाणी लागू होती या आणीबाणीची मुदत या महिन्यात संपणार होती, मात्र नीस येथे गुरूवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी फ्रान्समधल्या आणीबाणीची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे.
ओलांद यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांची आणि संरक्षण यंत्रणेची तातडीने बैठक बोलावली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून फ्रान्समध्ये दोनदा दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणेची तातडीने बैठक बोलवून अंर्तगत सुरक्षेचा ते आढावा घेणार आहेत.