भारताचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी १७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी ठरले आहेत. संसद भवनात आज सकाळी ११ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३५ टक्के मते मिळवत त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली. प्रत्यक्ष मतांची आकडेवरी केल्यास कोविंद यांना ७ लाख २ हजार ६४४ तर मीरा कुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडून आणण्याचे एनडीएचे डावपेच सफल ठरले आहेत.
या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता. रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून रामनाथ कोविंद यांच्या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा कोविंद यांना भेटण्यासाठी १० अकबर रोड येथील त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
NDA's #RamNathKovind all set to become the next President of India, official announcement awaited. pic.twitter.com/OGxBThFIqX
— ANI (@ANI) July 20, 2017
Official announcement made: NDA's #RamNathKovind wins Presidential elections, defeating opposition candidate Meira Kumar pic.twitter.com/gwUrsGiJTk
— ANI (@ANI) July 20, 2017
येत्या २५ तारखेला नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतील. संसदेचा सेंट्रल हॉल नव्या राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्याच्या समारंभासाठी सेंट्रल हॉलमध्ये नवीन कार्पेट टाकण्यात आले आहे. सध्या रामनाथ कोविंद १० अकबर रोड याठिकाणी तात्पुरत्या कालावधीसाठी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे आज त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर लगेचच या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा समावेश असलेले भारतीय लष्कराचे खास पथक येथे तैनात करण्यात येईल. जोपर्यंत नवे राष्ट्रपती त्यांच्या रायसीना हिल्स येथील निवासस्थानी जात नाहीत तोपर्यंत १० अकबर रोड येथे रामनाथ कोविंद यांच्यासाठी तात्पुरत्या सचिवालयही थाटण्यात येईल. या सचिवालयातील कर्मचारी उद्यापासूनच १० अकबर रोडवर कार्यरत असतील. याशिवाय, दिल्ली पोलिसांकडूनही या भागात विशेष सुरक्षा पुरवली जाईल.
रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. पक्षाचा दलित चेहरा असलेले रामनाथ कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील राहिले आहेत. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.