काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज, बुधवारी संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते.

राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मीरा कुमार यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. ही राष्ट्रपतिपदाची निवडणूक दलित विरुद्ध दलित नसून विचारधारेची लढाई आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. आपण २१ व्या शतकात आहोत आणि देशाच्या सर्वोच्च पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित असे स्वरुप देऊ नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यानंतर साधारण ११ वाजताच्या सुमारास त्या विरोधी पक्षांच्या नेत्यांसह संसदेत पोहोचल्या. तेथे त्यांनी लोकसभा सचिवांसमोर आपला उमेदवारी अर्ज सादर केला. मीरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीरा कुमार या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे राहुल म्हणाले. विभाजनाच्या विचारधारेविरोधात देशाला एकसूत्रात बांधणाऱ्या मूल्यांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या मीरा कुमार आमच्या उमेदवार असल्याचा अभिमान आहे, असे राहुल म्हणाले. दरम्यान, २३ जून रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. देशाचे संविधान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. देशाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मी जेव्हापासून राज्यपाल झालो आहे, तेव्हापासून मी कोणत्याही पक्षाचा नाही. राष्ट्रपतिपद आणि राजकारणाचा कोणताही संबंध असू नये, असे रामनाथ कोविंद यांनी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले होते.