पीटीआय, नवी दिल्ली

देशातील गेमिंग उद्याोगाला कोणत्याही नियमनाची गरज नसून तो मुक्त राहिला पाहिजे, तरच त्याची भरभराट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. पंतप्रधानांनी देशातील आघाडीच्या ऑनलाईन गेमरबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी ई-गेमिंग उद्याोगाचे भविष्य तसेच त्यासमोरील आव्हाने या मुद्द्यांवर चर्चा केली.

तीर्थ मेहता, अनिमेश अग्रवाल, अंशु बिष्ट, नमन माथुर, मिथिलेश पाटणकर, गणेश गंगाधर, पायल धरे या गेमरबरोबर पंतप्रधान मोदी यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यांच्याशी गप्पा मारताना मोदींनी त्यांना प्रश्न विचारले, तसेच काही गेमही खेळून पाहिले. यावेळी नमन माथुर याने गेमिंग क्षेत्रासाठी काही नियमनांची गरज आहे का असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘‘यामध्ये दोन गोष्टी आहेत, एकतर तुम्ही कायद्याअंतर्गत निर्बंध लादण्याचा प्रयत्न करता किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करता व देशाच्या गरजेनुसार त्यामध्ये बदल करता आणि ते संघटित व कायदेशीर रचनेमध्ये आणून त्याची प्रतिमा उंचावता.’’ ते पुढे म्हणाले, २०४७पर्यंत मध्यमवर्गीय कुटुंबे आणखी प्रगती करतील अशा प्रकारे देशाची प्रगती करण्याचा माझ्या सरकारचा प्रयत्न असेल. आपले दैनंदिन कामकाज कागदपत्रांच्या जंजाळात अडकले आहे, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. गरिबांना सरकारी मदतीची गरज असते, त्यांच्या कठीण काळात सरकारने त्यांच्याबरोबर असायला हवे’’, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप

सरकारने ‘इ-स्पोर्ट’ आणि गेमिंगला मुख्य प्रवाहातील क्रीडाप्रकार म्हणून मान्यता द्यावी. हे गेम्स कौशल्यावर आधारित आहेत. त्यांत जुगाराचा संबंध नसतो, असे अनिमेश अगरवाल यांनी सुचवले. त्यावर मोदी म्हणाले, ‘‘त्याला (इ-स्पोर्ट आणि गेमिंग) कोणत्याही नियमनाची गरज नाही. ते मुक्त राहायला हवेत, तरच त्याची भरभराट होईल,असे मला वाटते.’’

‘ऑनलाइन गेम’मध्येही मानसिक कौशल्ये!

मोदींनी गेमिंग आणि जुगार यांच्यातील संघर्ष कसे हाताळता हे गेमरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न यावेळी केला. गेमरनी या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ‘नूब’ आणि ‘ग्राईंड’ यांसारख्या संज्ञांचीही पंतप्रधानांना माहिती दिली. गुजरातमधील कच्छ येथील तीर्थ मेहताने मत व्यक्त केले की, ‘‘लोकांना वाटते की आम्ही वेळ घालवण्यासाठी गेम खेळतो. आम्ही गेम खेळतो कारण ते इतरांपेक्षा ते वेगळे असतात, ते बुद्धिबळाइतके क्लिष्ट असतात, त्यामध्ये मानसिक व शारीरिक कौशल्ये आवश्यक असतात’’.