नवी दिल्ली : भारतात आज जर कोणाला नवी कंपनी सुरू करायची असेल तर, त्याला तिचे भविष्यात काय होईल याची चिंता वाटत नाही, या उलट तो मोठय़ा उत्साहात प्रकल्प सुरू करतो आहे. देशाच्या विकासपथाला हे नवे वळण मिळाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले.

मोदी म्हणाले की, आता भारतीय माणूस केवळ नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत नाही, तर तो दुसऱ्यांना रोजगार देण्याचे स्वप्न पाहत आहे आणि जागतिक व्यासपीठावर त्यामुळेच भारताचे स्थान मजबूत होणार आहे. काही वर्षांपूर्वी देशात कोणी व्यवसाय किंवा नवी कंपनी सुरू करण्याचा विचार करीत असेल तर, त्याच्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी त्याला सांगायची की, ‘‘तुला नोकरी का करायची नाही? नोकरी कर रे बाबा!’’ नोकरीतून पगार मिळतो आणि त्यातून सुरक्षा मिळते. त्यात कष्टही कमी पडतात; पण आज जर कोणाला नवी कंपनी स्थापन करायची असेल तर, त्याच्या गोतावळ्यातील सगळी मंडळी उत्साहित होऊन त्याला पाठिंबा देतात. देशाच्या विकासाला मिळालेले हे नवे वळण आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आपल्यासारख्या देशात, जेथे युवकांची संख्या मोठी आहे, तेथे तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्या म्हणजे नव्या कल्पना, नवे शोध आणि जोखीम घेण्याची वृत्ती आणि करून दाखविण्याची धमक. या गोष्टींचा मेळ बसला की त्याचे फळ दिसून येते, चमत्कार घडतो, या शब्दांत मोदी यांनी युवकांना प्रोत्साहन दिले. जगभरात स्टार्टअप प्रकल्पांची आघाडी सांभाळण्याच्या मार्गावर आपला देश आहे. अशा प्रकल्पांसाठी देशात विक्रमी गुंतवणूक होत आहे. हे प्रकल्प लहानलहान गावांतही सुरू होत आहेत. २०१५ पर्यंत देशात जेमतेम नऊ ते दहा युनिकॉर्न (१०० कोटी डॉलपर्यंतचे स्टार्टअप) सुरू होत असत, पण गेल्या दहा महिन्यांत दर दहा दिवसांत असा एक प्रकल्प उभा राहत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. करोनाकाळातही आपल्या युवकांनी हे यश मिळविले. ते निश्चितच मोठे यश आहे. आज देशात ७० हून अधिक युनिकॉर्न आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी पुण्यतिथी (६ डिसेंबर) लक्षात घेता पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण करून दिले आणि लोकांनी देशाप्रति असलेली कर्तव्ये पार पाडण्याचे राज्यघटनेतच नमूद आहे, असे निदर्शनास आणून दिले.

सत्तेचा मोह नाही – मोदी

‘मला सत्तेचा मोह नाही. मी लोकांची सेवा करू इच्छितो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितले. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या एका लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादात मोदी यांनी हे मनोगत व्यक्त केले. गरिबांना आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी ही योजना असल्याचा मोदी यांनी उल्लेख केला.

युवा उद्योजकांशी संवाद

पंतप्रधान मोदी यांनी मयूर पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याने त्याच्या स्टार्टअपमधून वाहनांचे मायलेज वाढविण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत काम सुरू केले आहे. त्यासाठी त्याला सरकारकडून अनुदान मिळत आहे. भारतीय युवक त्यांच्या स्टार्टअपमधून जागतिक समस्यांवरही उत्तर शोधीत आहेत, असे कौतुकोद्गार मोदी यांनी काढले. आयुष्यमान भारत योजनेच्या दोन लाभार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.