पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस असून त्यानिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज मोदी आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत असून आजपासून भाजपाने २१ दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान सुरु केलं आहे. सोशल नेटवर्किंगवरही मोदींच्या वाढदिवसाचीच चर्चा असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाकडून मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचला जात असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. असं असतानाच राहुल गांधींच्या ट्विटने अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे.

नक्की पाहा >> Birthday Special: सव्वा लाखांचं पेन, Apple गॅजेट्सबद्दलचं प्रेम अन् गॉगलची किंमत…; जाणून घ्या मोदींकडील महागड्या वस्तूंबद्दल

कालच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मोदींनी सर्वांना मोफत करोना लस देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगतानाच आपण जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करुन घेत मोदींना वाढदिवसाची भेट देऊयात असं म्हटलं आहे. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मोदींच्या वाढदिवसाची लसीकरणाशी सांगड घालत एक ट्विट केलंय. चला आपण सारे भारतीय पंतप्रधान मोदींनी गिफ्ट देऊयात आणि लसीकरण करुन घेऊयात असं मांडविया म्हणाले आहेत. “चला लसीकरण सेवा करुयात आणि त्यांना (पंतप्रधान मोदींना) वाढदिवसाची भेट देऊयात. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी,” असं मांडविया यांनी म्हटलं आहे. खरं तर मांडविया यांनी गुरुवारी दुपारीच हे आवाहन केलं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना त्यांच्या ओळखीतील, नातेवाईकांना आणि समाजातील सर्व घटकांना लसीकरणासाठी प्रेरणा द्यावी असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हॅशटॅग चर्चेत; मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘जुमला’दिवस’चीही चर्चा

आज लसीकरणाचा विक्रम करण्याचा भाजपाचा मानस असून मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये लसीकरणाला चालना देण्याचाही भाजपाचा प्रयत्न असणार आहे. आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे. एकीकडे या सर्व गोष्टी सुरु असतानाच दुसरीकडे काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल करत “बेरोजगारी वाढल्याने लाखो तरुणांवरील ताण वाढलाय. इंडियन युथ काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणार आहे,” अशी घोषणा केलीय. रोना काळावधीमध्ये ३२ लाख पगारी व्यक्तींनी रोजगार गमावला असून मोदींचे श्रीमंत मित्र अधिक श्रीमंत होत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. “पकोडानॉमिक्स पुरे झालं आता येथील तरुणांना खरोखर नोकऱ्यांची गरज आहे,” असा टोलाही युथ काँग्रेसने लगावला आहे.

सोशल नेटवर्किंगवर मोदी समर्थक विरुद्ध विरोधक असा सामना रंगल्याचं चित्र दिसत आहे. अशातच राहुल गांधींनी अगदी मोजक्या शब्दात मोदींना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी जी, असं चार शब्दांचं ट्विट राहुल यांनी इंग्रजीमधून केलं आहे.

राहुल गांधीच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी शब्दांचा दुष्काळ पडलाय का असा खोचक सवाल विचारला तर काहींनी राहुल यांनी संसदेत मोदींना मारलेल्या मिठीचा फोटो पोस्ट केलाय.

शब्दांचा दुष्काळ पडलाय का?

हे तर फ्रेण्डशीप गोल्स

ट्विट पाहून हसू आलं

अशा गोष्टींमुळेच…

एकीकडे राहुल यांचं ट्विट चर्चेत असतानाच दुसरीकडे युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटरवरुन आजचा दिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन करताना, “१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस, निमित्त आहे कोट्यावधी तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारताच्या युवाविरोधी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस,” असं ट्विट केलं आहे.

नक्की पाहा >> चला आपण सारे भारतीय पंतप्रधान मोदींनी गिफ्ट देऊयात आणि…; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट चर्चेत

युथ काँग्रेस जारी केलेल्या पत्रकामध्ये बेरोजगारीचा दर हा २.४ वरुन १०.३ पर्यंत वाढल्याचा दावा केलाय. जुमला दिवस हा हॅशटॅगही आज चर्चेत असल्याचं ट्विटरवर दिसून येत आहे.