PM Modi In Italy : पंतप्रधान मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट!

G-20 देशांच्या शिखर बैठकीस पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असून, संबोधितही करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G-20 देशांच्या शिखर बैठकीसाठी इटली येथे पोहचलेले आहेत. मोदींनी आज पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. यावेळी व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची ही पहिलीच समोरा-समोर झालेली भेट होती. पोप, रोमन कॅथोलिकचे प्रमुख असतात, म्हणजेच ते ख्रिचनांचे धर्मगुरू असतात.

या अगोदर पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांची भेट घेतली होती. दोन्ही पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळस्तरावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला होता. याशिवाय पंतप्रधान मोदींनी यूरोपियन यूनियनच्या नेत्यांची देखील भेट घेतली.

तर, “पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले,” असं पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान द्रागी यांनी आपल्या द्विपक्षीय बैठकीत कृती आराखड्याद्वारे संबोधित केलेल्या धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. ज्यामध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्याच्या मुद्द्याचा समावेश आहे. तसेच, भारत आणि इटलीने आपापल्या उर्जा प्रणालींमध्ये नूतनीकरणक्षम उर्जेच्या वाढत्या प्रमाणात खर्च-प्रभावी एकत्रीकरणावर सहमती व्यक्त केली.

युरोपीय नेत्यांशी पंतप्रधानांची चर्चा

पंतप्रधान मोदींच्या रोम दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. मोदी आज G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि संबोधितही करणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपतींची देखील भेट घेणार आहेत. सिंगापूरच्या पंतपध्रानांशी देखील मोदींची भेट होणार आहे. या सर्व नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी जागतिक, आर्थिक, राजकीय व करोना महामारीबाबत स्वतत्रपणे द्विपक्षीय चर्चा करतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prime minister narendra modi met pope francis at the vatican today msr