रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीत आगमन झाले असून जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने त्यांनी  युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांच्याशी संयुक्त चर्चा केली.

लोक पातळीवरील संपर्क वाढवणे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारणे, त्याचबरोबर पृथ्वीवरील पर्यावरण व्यवस्थित ठेवण्याबाबत त्यांनी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांची जी २० बैठकीच्या निमित्ताने ही पहिलीच चर्चा होती.

जी २०  देशांच्या बैठकीत शाश्वत विकास, हवामान बदल, शाश्वत बदल, कोविड १९ साथीमुळे झालेल्या नुकसानातून पुन्हा आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे वाटचाल करणे या मुद्दय़ांवर  चर्चा होणार आहे.

 पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट  संदेशात म्हटले आहे, की रोम येथे पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत गाठीभेटी सुरू झाल्या असून त्यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा व युरोपियन मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. २०२० मध्ये भारत हा युरोपीय समुदायाचा दहावा मोठा व्यापारी  भागीदार होता.  युरोपीय समुदायाशी एकूण व्यापारापैकी १.८ टक्के व्यापार भारताचा आहे. भारत व युरोपीय समुदाय यांच्यातील २०२० मधला व्यापार ६५.३० अब्ज युरोचा होता.