पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवले असते, तर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी गोवा काही तासांतच स्वतंत्र झाला असता; मात्र पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होण्यास राज्याला १५ वर्षे लागली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्ला चढवला.
काँग्रेस गोव्याला आपल्या ‘शत्रूप्रमाणे’ वागणूक देत आला असून तीच वागणूक आताही सुरू आहे. त्या पक्षाने राज्यावर कायम लादलेल्या राजकीय अस्थैर्यातून हे दिसून येते, असे गोव्यातील मापुसा येथे प्रचारसभेत भाषण करताना मोदी म्हणाले. ‘गोव्याची राजकीय संस्कृती आणि गोव्याच्या युवकांच्या आकांक्षा काँग्रेस कधीही समजू शकला नाही. गोव्याबाबत त्यांची नेहमीच शत्रुत्वाची भावना राहिली आहे,’ असे राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपसाठी प्रचार करताना पंतप्रधानांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला ही गोष्ट अनेकांना ठाऊक नाही. भारताजवळ बलवान लष्कर आणि सशक्त नौदल होते. या ताकदीच्या आधारे काही तासांतच गोव्याचे स्वातंत्र्य साध्य झाले असते, मात्र काँग्रेसने १५ वर्षे काहीच केले नाही, असाही आरोप मोदी यांनी केला.