पीटीआय, थिम्पू
दिल्ली कारस्फोटामागील सूत्रधारांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. “या स्फोटाचा तपास करणाऱ्या संस्था या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि दोषींना शिक्षा होईल याची खबरदारी घेतील,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी भूतानच्या दौऱ्यावर गेले. तिथे ते भूतानचे माजी राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाले. हा सोहळा राजधानी थिम्पू येथील चांगलीमेथांग स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. दिल्लीतील घटनेनंतर आपण जड अंतःकरणाने भूतानला आलो आहोत, असे मोदी म्हणाले. सोमवारची संपूर्ण रात्र आपण तपास संस्थांच्या संपर्कात होतो, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
भूतानच्या नेत्यांनी स्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित असलेल्या भूतानच्या हजारो नागरिकांनी राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली स्फोटातील मृतांसाठी प्रार्थना केली.
अनेक शतकांपासून भारत आणि भूतानचे दृढ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी वचनबद्ध होतो. पण आज मी येथे जड अंतःकरणाने आलो आहे. दिल्लीतील भयावह घटनेने सगळ्यांनाच दुःखी केले आहे. आमच्या तपास संस्था या कटाच्या मुळाशी जातील. कटाच्या सूत्रधारांना सोडणार नाही. सर्व जबाबदार लोकांना शिक्षा होईल.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
