भारताने सोमवारी ओडिशातील किनाऱ्यावर पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची क्षमता ३५० कि.मी असून ते अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
पृथ्वी क्षेपणास्त्राची क्षमता ५०० ते १००० किलो वजनाची अस्त्रे वाहून नेण्याची असून द्रव इंधनाच्या दोन इंजिनांच्या मदतीने ते आकाशात झेपावले असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. चलत प्रक्षेपकावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले असून ते युद्धक्षेत्रात अधिक लवचिकपणे काम करू शकेल.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र चंडपूर येथील संकुल ३ च्या एकात्म चाचणी क्षेत्रातून सकाळी सव्वानऊ वाजता सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राच्या उपयोजित चाचण्या यशस्वी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे ओडिशा किनाऱ्यावरील रडार, विद्युत-प्रकाशीय प्रणाली, दूरसंदेश स्थानके यांच्या मदतीने या क्षेपणास्त्राचा मार्ग तपासण्यात आला. अतिशय अचूक पद्धतीने हे उड्डाण झाले असेही सांगण्यात आले.
***
पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये तैनात करण्यात आले असून देशाच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ते तयार करण्यात आले आहे.
***
प्रकल्पाचे संचालक ए.डी.अदालत अली व एन.शिव सुब्रह्मण्यम हे  उड्डाणाच्यावेळी उपस्थित होते. २० डिसेंबर २०१२ रोजी या पृथ्वी २ क्षेपणास्त्राच्या उपयोजित चाचण्या घेण्यात आल्या होत्या.