मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काल राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेसकडून देशभरात निर्देशने करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही या निर्णयावरून मोदी सरकावर टीकास्र सोडलं आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – भाजपमधील ओबीसी नेते राहुलविरोधात आक्रमक
काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
“भाजपाचे प्रवक्ते, नेते आणि स्वत: पंतप्रधान मोदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा भाऊ, माझे आई-बाबा आणि पंडित नेहरुंवर खालच्या पातळीवर टीका करतात. पण आजपर्यंत त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही. मात्र, राहुल गांधी यांनी संसदेत अडाणींचा मुद्दा उपस्थित केला. यावर सरकारला प्रश्न विचारले, म्हणून मानहानीच्या निमित्ताने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली”, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिली.
“राहुल गांधींवरील कारवाई हे मोठं षडयंत्र”
“गेल्या एका वर्षापासून या प्रकरणाला स्थगिती दिली होती. याचिकाकर्त्याने स्वत: हे प्रकरण स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी अदाणींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारले आणि त्यानंतर याचिकाकर्त्याने अचानक हे प्रकरण पुन्हा बाहेर काढलं. मुळात मोदी सरकारला अडाणींच्या मुद्यावर उत्तर द्यायचं नाही. त्यामुळे षडयंत्र रचून राहुल गांधी यांना संसदेच्या बाहेर काढण्यात आलं”, असा आरोपही त्यांनी केला.
“आमच्या शरीरात शहिदांचं रक्त”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “राहुल गांधी आणि काँग्रेस या विरोधात जोरदार लढा येईल. आमच्या शरीरात शहिदांचं रक्त आहे. आम्हाला ते नेहमी परिवारवादी म्हणातात. मात्र, आमच्या परिवाराने या देशासाठी बलिदान दिलं आहे. आम्ही माघार घेणार नाही. आम्ही मोदी सरकारला घाबरणार नाही.”