Red Fort Delhi Explosion Updates : दिल्लीतल्या लाल किल्ला भागात i 20 कारचा स्फोट झाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमागे काय काय पैलू आहेत याचा शोध घेतला जातो आहे. ज्यानंतर आता कार स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर आलं आहे. पुलवामा येथील एका रहिवाशाने २९ ऑक्टोबरला ही आय २० कार खरेदी केली होती.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार,ह्युंदाई कंपनीची i-20 कार या स्फोटांसाठी वापरली गेली. तर या कारचा मूळ मालक दिल्लीतला मोहम्मद सलमान हा आहे. सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली. त्यानंतर नदीमने i-20 कार ‘रॉयल कार झोन’ या डीलरला विकली. दरम्यान या कारच्या खरेदी-विक्रीत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता असे सांगितले जात आहे.
दिल्लीतल्या कार स्फोटाचं पुलवामा कनेक्शन काय?
दिल्लीत ज्या कारचा स्फोट झाला ती पुलवामा येथील रहिवासी तारिकला विकली गेली होती. तारिकच्या चाव्यांवर रॉयल कार झोन असे नाव आहे, ही फरिदाबादमधील वापरलेल्या गाड्या विकणारी कंपनी आहे. पुलवामाच्या तारीकने ‘रॉयल कार झोन’कडून i-20 कार घेतली. तारीक मूळचा पुलवामाचा आहे पण तो फरीदाबादमध्ये राहत होता. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटके सापडलेला डॉ.मुझम्मील शकीलही पुलवामाचाच आहे. त्यामुळे मुझम्मील शकीलच्या अटकेनंतर तारीकने घाबरुन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आता व्यक्त केला जातो आहे.
तीन तासांहून अधिक काळ पार्किंगमध्ये उभी होती कार
पोलीस तपासात अशी माहिती पुढे आली आहे कि, स्फोटापूर्वी ही कार तीन तासांहून अधिक काळ पार्किंगमध्ये उभी होती. या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) यांच्यासह अनेक तपास यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, ‘सर्व शक्यतांचा विचार करून आम्ही सखोल तपास करू आणि सर्व पर्यायांची तात्काळ चौकशी करून निष्कर्ष जनतेसमोर मांडले जातील’. या स्फोटाच्या काही तास आधी फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती, त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे.
कोण आहे मुझम्मील अहमद?
मुझम्मील अहमद हा पुलवामाचा रहिवासी आहे. त्याला आधी अटक करण्यात आली. त्यानंतर डॉ. आदिललाही अटक झाली. पोलिसांनी ३५८ किलोंची स्फोटकंही जप्त केली. उमर नबी हा मुझम्मीलच्या अटकेनंतर गायब झाला होता. उमर नबीने कारसह स्वतःला उडवून घेतलं असावं असा संशय आम्हाला आहे अशी माहिती दिल्ली पोलीस सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
