जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या राजकारण्यांना लष्कराकडून पैसे दिले जातात, या माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या आरोपांची निर्धारित वेळेत आणि पारदर्शकपणे चौकशी करण्याचा ठराव जम्मू-काश्मीरमधील विधानसभेत सोमवारी एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, सिंह यांच्याविरोधात विधानसभेमध्ये दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावरील निर्णय सभापतींनी राखून ठेवला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच भारतीय लष्करातर्फे जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या राजकारण्यांना पैसे दिले जाताहेत, असे सिंह यांनी म्हटले होते. त्यावर जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये चार तास चर्चा झाली. चर्चेच्या शेवटी हा ठराव मंजूर करण्यात आला. जनरल व्ही. के. सिंह यांनी केलेल्या सर्व आरोपांची निर्धारित वेळेत आणि पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी, असा ठराव हे सभागृह एकमताने करीत असल्याचे सभापती मुबारक गुल यांनी स्पष्ट केले.
सभागृहातील चर्चेला उत्तर देताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, सिंह यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचे आरोपांमुळे लोकांमधील आमच्या प्रतीमेचे हनन झाले आहे. आमच्याकडे लोकं बोट दाखवायला लागलेत. त्यांच्या आरोपांमुळे विरोधकांनाही लोकांसमोर आमच्यावर आरोप करायला संधी मिळणार आहे.