जगातील कुठल्याही एका देशाला, प्रांताला किंवा धर्माला दहशतवादाची भीती नसून ती संपूर्ण जगाला आहे असे प्रतिपादन करताना गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी प्रत्येक समाजाने स्वतच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले आहे.
भारतात कुठल्याही विषयाची चर्चा आणि विचारविनिमय सुरू झाल्यावर त्यात धर्माचा मुद्दा येतोच आणि हिच बाब अतिशय वेदनादायी आहे. भारतातील कुठल्याही प्रांतात कुठलीही घटना घडली तर त्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मूळ घटना बाजूलाच राहते, असेही रिजीजू यांनी म्हटले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा बैठकीत रिजीजू बोलत होते.
ते म्हणाले, जगातील कुठलाही धर्म हिंसाचाराचे समर्थन करत नाही. त्यामुळे प्रत्येक धर्माच्या नेत्यांनी जगभरात कुठेही हिंसाचार घडू नये यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांबरोबरच प्रसारमाध्यमांची भूमिकाही महत्त्वाची आहे. कुठल्याही देशाचे सरकार एकटे दहशतवादाचा सामना करू शकत नाही. त्यासाठी सर्वाच्या मदतीची गरज असते.