पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. भारतात अनेक ठिकाणी चिनी सामानाला बॉयकॉट करण्याबाबत अभियानही सुरू झालं आहे. शनिवारी चिनी सामानाचा बहिष्कार करण्यासाठी भारतीय किसान युनियन (भानू) आणि हिंदू रक्षा दलाचे काही कार्यकर्ते चिनी मोबाइल कंपनी ओप्पोच्या ग्रेटर नोएडाच्या फॅक्टरीबाहेर निदर्शनं केली.

ग्रेटर नोएडाच्या ओप्पोच्या फॅक्टरीबाहेर निदर्शनकर्त्यांनी चीनविरोधी जोरदार घोषणा दिल्या. तसेच, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा पुतळाही जाळला. “लडाखमध्ये जवान शहीद झाल्याने आम्ही दुःखी आहोत. भारतीयांनी ओप्पो फोन खरेदी करु नये, चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारनेही सर्व चिनी कंपन्या बंद करायला हव्यात. त्यामुळे भारतीय जवानांवर पुन्हा हल्ला करण्याआधी ते दोनदा विचार करतील”, अशी प्रतिक्रिया यावेळी हिंदू रक्षा दलाकडून देण्यात आली. तर, “चीनने सीमेवर जे काही केलं ते डरपोक लोकांचं काम होतं.आमचे 20 जवान शहीद झाले आणि अन्य जखमी झाले, त्यामुळे आम्ही चिनी वस्तूंचा विरोध करतोय. आम्ही चिनी सामानासह त्यांचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि चिनी झेंड्याला आग लावली. भारतीय किसान युनियनचे सर्व कार्यकर्ते लढाईसाठी तयार आहेत. संपूर्ण देशात चीनविरोधात संताप आहे”, असं निषेध करणाऱ्या भारतीय किसान युनियनच्या एका कार्यकर्त्याने म्हटलं.

दरम्यान, पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या 32 जणांविरोधात एफआयआर दाखल केला. करोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी न घेता एकाच ठिकाणी गर्दी जमल्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कलम 144 लागू आहे, त्याचं उल्लंघन केल्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. निदर्शन करणाऱ्या ३२ जणांविरोधात आयपीसी कलम 188, 270 आणि 279 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती गौतम बुद्ध नगर पोलिसांनी दिली.