नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरावर आंदोलकांनी आता कब्जा केला आहे. नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुणाईचा मोठा क्षोभ पाहण्यास मिळाला. प्रचंड क्षोभानंतर नेपाळ सरकारने सोशल मीडियावरची बंदी उठवली. पण तरुणांचं आंदोलन आणखी पेटत चाललं आहे.

काठमांडू आंदोलनांनी हादरलं

नेपाळची राजधानी काठमांडू सोमवारी निदर्शनांनी हादरली. या निदर्शनांमध्ये किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील ही अलिकडील काळातील सर्वात हिंसक निदर्शने असल्याचे सांगण्यात आलं. समाजमाध्यमांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात काठमांडूमधील मैतीघर मंडाला येथून निदर्शनांना सुरुवात झाली. पार्लमेंटच्या जवळ आल्यानंतर निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडले आणि ते पार्लमेंटच्या आवारात शिरले आणि निदर्शनांना हिंसक वळण लागलं. आता आंदोलकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरावर कब्जा केला आहे.

हिंसाचारात आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो लोक जखमी झाले आहेत. नेपाळी माध्यमांच्या वृत्तानुसार, १२ हजारांहून अधिक तरुण रस्त्यावर उतरले असून, सरकारविरुद्ध घोषणा देत आहेत. सरकारने म्हटले आहे की, बनावट आयडी असलेले सोशल मीडिया युजर्स द्वेषपूर्ण आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत. याचबरोबर काही प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक आणि इतर गुन्हे करत आहेत. यामुळे सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.” मात्र या निर्णयाविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला. ज्यानंतर ही बंदी उठवण्यात आली. तरीही आंदोलन सुरु आहे.

समाजमाध्यमांवर बंदी घातल्याने हिंसेचा कडेलोट

नेपाळमध्ये इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा प्रचंड वापर होतो. तेथील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ऑनलाईन असल्याची आकडेवारी आहे. नेपाळच्या लोकसंख्येत १६ ते २५ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण २०.८ टक्के आहे. विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या समाजमाध्यांचा ते भरपूर प्रमाणात वापर करतात. त्याबरोबरच एक्स, रेडइट, लिंक्डइन, पिंटरेस्ट, सिग्नल, वीचॅट यांच्यासह २६ समाजमाध्यमांवर बंदी आल्यामुळे या तरुणांच्या थेट दैनंदिन जीवनावरच परिणाम झाला आणि ते संतप्त झाले. टिकटॉकने सरकारी नियमनांचे पालन केल्यामुळे त्यांच्यावर बंदी नाही.

नेपाळमध्ये घडलेल्या ठळक घडामोडी

आंदोलकांनी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांच्या निवासस्थानात घुसून त्या निवासस्थानाची तोडफोड केली, निवासस्थानाला आग लावली.

नेपाळमधील कीर्तिपुर नगरपालिकेचं कार्यालय पेटवलं

नेपाळमधील काँग्रेसचे अध्यक्ष आणि सत्ताधारी नेते शेर बहादुर देऊवा यांच्या घराला आग लावली, वाहनं जाळली.

या सगळ्या घडामोडींनंतर गृहमंत्री, कृषी मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला.

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केला आणि तोडफोड केली.

नेपाळचे उपपंतप्रधान रघुवीर महासेठ यांच्या जनकपूर येथील घरावर आंदोलकांनी दगडफेक केली. पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण दगडफेक थांबली नाही.

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत, हिमालय एअरलाइन्सना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.