पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या सीमेजवळ असणाऱ्या कोट्टाकुपम येथे घडलेल्या एका विचित्र घटनेमध्ये एका व्यक्तीचा आणि त्याच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. दिवाळीनिमित्त गुरुवारी देसी बनवावटीचे फटाके आपल्या स्कुटरवरुन घरी नेत असतानाच गोणीमध्ये ठेवलेल्या फटाक्यांचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाप- लेकाचा मृत्यू झाला. तसेच स्कुटरवरुन जात असतानाच हा स्फोट झाल्याने या स्कुटरच्या आजूबाजूने जात असणारे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव कलाईसेन असं असून तो ३७ वर्षांचा होता. कलाईसेनचा सात वर्षांचा मुलगा प्रदिशचाही यामध्ये मृत्यू झालाय. कलाईसेन हा एका खासगी कंपनीमध्ये काम करायचा. तो दिवाळीच्या काळामध्ये अर्यनकुप्पम येथून स्वस्तात मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी करुन ते पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या सीमेजवळच्या भागांमध्ये विकायचा.
पोलिसांनी जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे बाप लेक आपल्या स्कुटरवरुन जाताना दिसत आहेत. मुलाने फटाक्यांची गोण हातात पकडली आहे. कोट्टाकुप्पम येथे हे दोघे पोहचले असताना अचानक या फटाक्यांचा स्फोट झाला आणि दोघेही स्कुटवरुन दूर फेकले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही जवळजवळ १० ते १५ मीटर दूर फेकले गेले. या अपघातामध्ये शेजारुन बाईकवरुन जाणारे गणेश (४५), सय्यद अहमद (६०) आणि विजी (३६) हे तिघेही जखमी झाले आहेत. या सर्वांना जेआयपीएमईआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
इंडियन एक्सप्रेशशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ नोव्हेंबर रोजी कलाईसेनने दोन बॅग भरुन फटाके घेऊन आपल्या नातेवाईकांच्या घरी ठेवले होते. नंतर ४ नोव्हेंबर रोजी तो हे फटाके घेऊन आपल्या मुलासहीत प्रवास करत होता. मात्र अचानक या फटाक्यांचा स्फोट झाला. उष्णता आणि घर्षण यामुळे फटाक्यांनी पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
बेकायदेशीरपणे फटाक्यांची वाहतूक करुन जीव धोक्यात टाकू नये असंं पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात असतानाही अनेकदा स्थानिकांकडून होलसेलमधून फटाके खरेदी करुन ते ग्रामीण भागांमध्ये थोड्या जास्त किंमतीला विकून पैसा कमावण्याची स्पर्धा दिसून येते.