देशात करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. तर, ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. सध्या करोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. सरकारही लसीकरणावर भर देत असून गावोगावी तसेच घरोघरी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण करत आहेत. लस आणि लसीकरणाच्या सर्व सोयी उपलब्ध असूनही लस न घेणारे लोक देखील आहेत. एक व्यक्ती लसीकरणापासून बचावासाठी थेट झाडावर चढून बसल्याचा प्रकार समोर आलाय. पुदुच्चेरीच्या एका गावामध्ये ही घटना घडली आहे.
करोनाची लस देण्यासाठी आरोग्य अधिकारी गावात आले होते. आरोग्यसेवा कर्मचार्यांना पाहिल्यानंतर हा ४० वर्षीय व्यक्ती झाडावर चढला आणि झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्यास सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ४० वर्षांच्या व्यक्तीने लस घेण्यास नकार दिला आणि झाडावरून चढून झाडाची छाटणी करण्यास सुरुवात केली. आरोग्य कर्मचारी आणि इतरांनी त्याला खाली उतरून लस घेण्यास सांगितलं असता त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना झाडावर चढून लस देण्याचे आव्हान केले.




आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला लस घेण्यासाठी समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण तो माणूस झाडाखाली उतरला नाही. आरोग्य कर्मचारी त्याची झाडाखाली उतरण्याची वाट पाहत काही वेळ तिथेच थांबले, परंतु तो खाली न उतरल्याने अखेर ते निघून गेले. पुदुच्चेरी सरकारच्या नव्या आदेशाप्रमाणे आरोग्य कर्मचारी १०० टक्के लसीकरण साध्य करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत.