वारंवार पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात भुमिका घेणारे तसेच लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांना बंड करण्याची शिक्षा मिळाली आहे. कारण, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंत्रीमंडळात त्यांचे खांदेपालट केले आहे.
सिद्धू यांच्याकडील शहरी विकास मंत्रालय आणि पर्यटन व सांकृतीक मंत्रालयाची जबाबदारी काढून वीज आणि नवीकरण ऊर्जा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिद्धू यांच्याबरोबरच इतर अनेक राज्यमंत्र्यांची खातीही बदलण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली होऊ न शकल्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. आपल्याला जाणूनबुझून टार्गेट केले जात असल्याचा आरोपही सिद्धूंनी मुख्यमंत्र्यांवर केला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज कॅबिनेटची पहिली बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला सिद्धू यांनी दांडी मारली. तसेच काही लोकांना मला मंत्रीमंडळातून बाहेर काढायचे आहे अशा शब्दांत नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर आरोप केला होता.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेल्या सिद्धूंनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसच्या खराब कामगिरीला आपल्याला जबाबदार धरले जात आहे. हे चुकीचे असून पराभव ही सामुहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. मला बेदखल करता येणार नाही, केवळ माझ्याविरोधातच का कारवाई केली जात आहे. इतर नेते आणि मंत्र्यांवर का कारवाई केली जात नाही, असा सवाल करताना माझी कामगिरी कायमच चांगली राहिली आहे, अशा शब्दांत सिद्धू यांनी नाराजी व्यक्त केली होती.