लाहोर/डेर बाबा नानक (गुरदासपूर)

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी गुरुवारी कर्तारपूर कॉरिडॉरमधून प्रवास करत पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये दर्शन घेऊन प्रार्थना केली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कॉरिडॉर २० महिने बंद ठेवण्यात आला होता.

कर्तारपूर कॉरिडॉरचे एक टोक भारतात आहे. पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब, शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांचे अंतिम विश्रामस्थान, गुरुदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाबा नानक मंदिराशी जोडतो. कॉरिडॉरची एकूण लांबी सुमारे पाच किलोमीटर आहे. या कॉरिडॉरनंतर दर्शनासाठी व्हिसाची गरज नाही. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी या कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, १६ मार्च २०२० रोजी करोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कॉरिडॉर बंद करावा लागला.

इवाकी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे प्रवक्ते अमीर हाश्मी यांनी लाहोरमध्ये सांगितले की, चन्नी यांच्या नेतृत्वाखालील गटाव्यतिरिक्त, भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानेही गुरुद्वारा दरबार साहिबला भेट दिली.

‘भारतातील पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह सुमारे ३० जणांनी आज कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करून गुरुद्वारा दरबार साहिब, कर्तारपूरला भेट दिली. चन्नी यांच्या नेतृत्वाखालील ‘जथा’(समूह)मध्ये पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचा समावेश नव्हता, असे हाश्मी यांनी सांगितले. सिद्धू हे १८ नोव्हेंबरऐवजी २० नोव्हेंबरला गुरुद्वारा येथे दरबार साहिब येथे जाऊ  शकतात, असे त्यांना अधिकृतपणे कळवण्यात आल्याचे सिद्धू यांचे माध्यम सल्लागार सुरिंदर दल्ला यांनी सांगितले.