scorecardresearch

काँग्रेसमध्ये खदखद

दुसरीकडे, पंजाबच्या निमित्ताने काँगे्रसमधील जुना कलह पुन्हा उफाळून आला असून, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाला लक्ष्य केले आहे.

काँग्रेसमध्ये खदखद

सिद्धू-चन्नी चर्चा सफल ठरल्याचा दावा; कार्यसमितीची बैठक लवकरच

पंजाबमधील घडामोडींच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यातील बैठकीत सर्व मुद्दे निकालात निघाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांचा निषेध करत ज्येष्ठ नेत्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी पक्षनेतृत्वाकडे केली. दरम्यान, काँग्रेस कार्यसमितीची बैठक लवकरच होणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

पंजाबमध्ये खांदेपालटानंतरही काँग्रेसमधील संघर्ष कायम राहिला. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी केलेल्या नियुक्त्यांवरून नाराज झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याबाबत गुरुवारी उभय नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यात सर्व मुद्दे निकालात काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे या प्रकरणावर तूर्त पडदा पडल्याचे चित्र दिसते.

दुसरीकडे, पंजाबच्या निमित्ताने काँगे्रसमधील जुना कलह पुन्हा उफाळून आला असून, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाला लक्ष्य केले आहे. पक्षसंघटनेत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या ‘जी-२३’ मधील कपिल सिबल यांनी बुधवारी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. त्याचा गुलाम नबी आझाद, पी. चिदम्बरम, आनंद शर्मा, भूपिंदर सिंग हुड्डा, विवेक तन्खा, राज बब्बर आदी नेत्यांनी निषेध केला. या ‘नियोजित गुंडगिरी’प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी आनंद शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री नटवर सिंह यांनीही गुरुवारी पक्षनेतृत्वाला लक्ष्य केले. काँगे्रसच्या आजच्या स्थितीला राहुल गांधी यांच्यासह तिघे जण जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पक्षांतर्गत कलह वाढू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या कार्यसमितीची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे कॉंगे्रसने स्पष्ट केले. हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे संकेत गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार, लवकरच ही बैठक होईल, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी सांगितले.

‘भाजपमध्ये जाणार नाही, पण काँग्रेस सोडणार’

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आल्याने नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. काँग्रेस सोडणार, पण भाजपमध्ये जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नवज्योतसिंग सिद्धू यांनी निवडणूक लढवल्यास त्यांना जिंकू देणार नाही, असा पुनरुच्चारही अमरिंदर यांनी केला. अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने ते भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरू होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab congress punjab state president resigns navjot singh sidhu chief minister charanjit singh channi akp

ताज्या बातम्या