तरुणीने लग्नास नकार दिल्याने तरुणाने तिच्या ११ वर्षांच्या भावाची हत्या केल्याची घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अझलाम आलम (वय ३०) याला दिल्लीतून अटक केली आहे.
लुधियानात राहणाऱ्या आलमचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, आलम हा विवाहित असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. यानंतरही आलम तिच्या मागे लागला होता. तरुणीला धडा शिकवण्यासाठी आलमने तिच्या भावाच्या हत्येचा कट रचला. त्याने २७ जुलै रोजी तरुणीच्या ११ वर्षांच्या भावाचे अपहरण केले. यानंतर त्याला गावाजवळील पुलावरुन नदीत फेकले. हत्येच्या सात दिवसांनी त्याने तरुणीच्या वडिलांना मेसेज करुन खंडणीची मागणी केली. तुमच्या मुलाचे अपहरण केले असून त्याच्या मोबदल्यात २ लाख रुपये द्यावे, असे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते.
याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आझमने हे कृत्य केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली असून चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. अद्याप, मुलाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नसून मृतदेहाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.