पठाणकोट येथील हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या एका हेरास अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव इर्शाद अहमद असून तो ममून छावणी भागात काम करीत होता. पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली असून तो भारतीय आहे. त्याने कॅन्टोन्मेंट परिसराच्या अंतर्गत भागातील साधन सुविधा व आस्थापानांची छायाचित्रे दहशतवाद्यांना पुरवली होती. पठाणकोटचा हल्ला गेल्या महिन्यात जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी केला होता. अहमद याने त्याच्या स्मार्टफोनच्या मदतीने छायाचित्रे घेऊन ती जम्मूतील दहशतवादी सज्जाद याला पाठवली होती. सज्जाद याला जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. त्याचे जाबजबाब आता इर्शाद याने दिलेल्या माहितीच्या आधारे घेतले जात आहेत. इर्शाद अहमद हा सज्जादला छायाचित्रे पाठवत होता व सज्जाद ती ई-मेलने पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठवीत होता. इर्शाद हा महंमद अस्लम यांचा मुलगा असून केंद्रीय गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. गुप्तचरांना त्याने स्मार्टफोनच्या मदतीने संवेदशील ठिकाणांची छायाचित्रे पाठवल्याचे समजले होते. पठाणकोट कॅन्टोन्मेंट हा भारतीय लष्कराचा एका मोठा तळ असून तेथे पायदळ तैनात आहे, इर्शाद कुणाच्या सूचनांनुसार काम करीत होता याची चौकशी सुरू आहे.