पंजाबमधील एका महिलेला ट्रॅव्हल एजंटने फसवून अनधिकृतरित्या गुलाम म्हणून सौदी अरेबियातील एका कुटुंबाला विकल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नाने ही महिला उद्या मायदेशी अर्थात भारतात परतणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत माहिती दिली.

परमजीत कौर असे पंजाबमधील या पीडित महिलेचे नाव असून ती १३ जुलै रोजी सौदी अरेबियात कामानिमित्त गेली होती. त्यानंतर तीने २१ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबियांशी फोनवरुन संपर्क साधला आणि तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर, या महिलेचा पती मलकीत राम (वय ४५) याने आपल्या गावातील एका ट्रॅव्हल एजंटविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

रेशम भट्टी असे या ट्रॅव्हल एजंटचे नाव असून त्याने राम यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेत परमजीत यांना सौदी अरेबियात काम शोधून देतो म्हणून सांगितले होते. आपली पत्नी स्वतः तिकडे काम करते आणि महिन्याला ४०,००० हजार रुपये कमावते, सध्या ती तेथे कायमस्वरुपी कामावर असल्याचे भट्टीने सांगितले होते. त्यानुसार, परमजीत यांना फसवून भट्टी याने सौदीत नेले. तेथे त्यांना घरकामही मिळवून दिले. मात्र, त्यानंतर घरमालकाने परमजीत यांचा पासपोर्ट स्वतः जवळ ठेऊन घेतला. त्यानंतर तिला घराबाहेर जाण्यासही मज्जाव करण्यात आला, अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रॅव्हल एजंट भट्टी हा फरार असून त्याच्यावर गुलाम म्हणून माणसाची विक्री केल्याप्रकरणी आयपीसीच्या ३७० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ४२० अंतर्गत फसवणूक आणि १२० बी अंतर्गत गुन्ह्याचा कट रचल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची परराष्ट्र खात्याने गंभीर दखल घेत परमजीत कौर यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर अखेर उद्या त्या आपल्या घरी परतणार आहेत.