युक्रेनच्या प्रश्नावर तणाव वाढत असून रशियाने सीमेवर सैन्याची जमवाजमव चालू केली आहे, या परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.  
युक्रेनच्या प्रश्नावर राजनैतिक तोडगा काढण्याबाबत उभय नेत्यात चर्चा झाली. त्यानंतर पुतिन यांनी ओबामा यांना दूरध्वनी  करून युक्रेनच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी हेग येथील जी-७ देशांच्या परिषदेवेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावारोव यांच्यापुढे जो प्रस्ताव मांडला होता त्यावर चर्चा केली. दरम्यान लावारोव यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देश व रशिया यांच्यातील दरी कमी होत असून युक्रेनची सीमा ओलांडण्याचा आमचा इरादा नाही असे लावारोव यांनी सांगितले.
ओबामा यांनी असे सुचविले की, रशियाने या प्रस्तावावर ठोस व लेखी प्रतिसाद द्यावा तसेच केरी व लावारोव यांच्यात चर्चेची पुढची फेरी होईल, युक्रेनच्या सरकारशी राजनैतिक मार्गाने चर्चा करून तोडगा काढावा लागेल, तणाव कमी करण्यासाठी युक्रेनला आमचा पाठिंबा आहे.
रशियाने सैन्य माघारी घ्यावे तसेच युक्रेनच्या सार्वभौमत्व व एकात्मतेचा भंग होईल अशी कुठलीही कृती करणार नाही याची हमी द्यावी. युक्रेनचा एक भाग ताब्यात घेतल्याबद्दल अमेरिकेची नाराजी कायम आहे असे ओबामा यांनी सांगितले.
 युक्रेन सरकारच्या समन्वयानेच अमेरिकेने हा प्रस्ताव मांडला आहे व रशियाचा प्रतिसाद अपेक्षित आहे असे सांगण्यात आले. केरी व लावारोव हे परिस्थिती निवळण्यासाठी प्रस्तावावर चर्चा करतील असे अपेक्षित असल्याचे व्हाइट हाऊसच्य सूत्रांनी सांगितले.