पाकिस्तानच्या ताब्यात असलेले नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत तडजोड केली जाणार नाही असा सूर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी आळवला आहे. लष्कराने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.  कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असून पाकिस्तानने त्यांना भारताच्या स्वाधीन करावे असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ठणकावून सांगितले आहे.

जाधव यांना रावळपिंडी न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारताकडून लगेचच या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला होता. जाधव यांना सुनाविण्यात आलेली फाशीची शिक्षा म्हणजे त्यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताने केला आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकरवी भारताने पाकला खरमरीत संदेशही पाठवला होता.

सुषमा स्वराज म्हणाल्या, कुलभूषण जाधव यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचा पुरावा आढळलेला नाही. त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांना फाशीची शिक्षा देणे म्हणजे पूर्वनियोजित हत्याच ठरेल असे स्वराज यांनी सुनावले. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या दिशेने पाकिस्तानने पाऊल टाकले तर पाकिस्तानने परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. दोन्ही देशांमधील संबंधावर याचे परिणाम होतील असे त्यांनी सांगितले. जाधव यांच्या रक्षणासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करणार. ते देशाचे सुपूत्र आहेत असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जाधव यांना लष्करी न्यायालयाकडून शिक्षा सुनावताना पाकिस्तानी कायद्यातील सर्व नियम व कायद्यांचे पालन करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. तसेच फाशीच्या शिक्षेविरोधात कुलभूषण जाधव दाद मागू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाधव यांच्याकडे फाशीच्या निर्णयाविरोधात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ६० दिवसांचा अवधी आहे. मात्र, यापूर्वीही कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावताना पाकिस्ताने कायद्याचे पालन केल्याचे आसिफ यांनी म्हटले. लष्करी न्यायालयात जाधव यांच्यावर तब्बल तीन महिने खटला सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.