कतारशी राजनैतिक संबंध तोडल्यानंतर सौदी अरेबियाने ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीकडे मोर्चा वळवला आहे. सौदी अरेबियातील सरकारने अल जझीराला दिलेला परवाना रद्द केला असून वृत्तवाहिनीचे सौदीतील कार्यालयदेखील बंद करण्यात आले आहे.
सोमवारी बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या चार अरब देशांनी कतारशी असलेले राजनैतिक संबंध तोडले. या देशांनी कतारशी हवाई व सागरी संबंध तोडण्याचे स्पष्ट केले. सौदी अरेबियाने कतारलगत जमिनीवरची सीमा बंद केल्याने कतारचा अरबी द्वीपकल्पाशी संबंध तुटला आहे. कतारने इस्लामी गटांना पाठिंबा दिला असून, इराणशी जवळिकीचे संबंध ठेवले आहेत, त्यामुळे या देशांनी कतारशी संबंध तोडल्याचे या चार देशांच्या वतीने सांगण्यात आले.
कतारशी संबंध तोडल्यानंतर कतारच्या मालकीच्या ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीचा सौदी अरेबियातील परवानाही रद्द करण्यात आला आहे. ‘अल जझीरा’ वाहिनीनेही दहशतवादाला प्रोत्साहन दिले असून सौदीतील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे सौदी अरेबियातील सरकारने म्हटले आहे. तर ‘अल जझीरा’ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘अल जझीरा’ ही स्वायत्त संस्था असून प्रदेशातील प्रत्येक देशाला व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे काम आम्ही करत आहे असे अल जझीराने म्हटले आहे.
दरम्यान, या तणावाचा कतार एअरवेज हवाई वाहतूक कंपनीवर याचा काय परिणाम होईल हे समजलेले नाही. पण कतारवर या तणावाचा काही परिणाम झालेला नाही. कतारने आधी दहशतवादी गटांना निधीपुरवठा नाकारला होता. कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांची भेट घेऊन त्यांचे अध्यक्षपदी फेरनिवडीबाबत अभिनंदन केले होते. इराणबरोबर कतारने जाऊ नये अशी सौदी अरेबियाची इच्छा होती. अमेरिकी नौदलाचे पाचवे आरमार बहारीनमध्ये आहे व त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. कतारने मुस्लीम ब्रदरहूडचे अध्यक्ष महमद मोरसी यांच्याशी संबंध ठेवले होते ते सौदी अरेबियाला आवडले नव्हते. नैसर्गिक वायुसंपन्न कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप २०२२ ही स्पर्धा होणार आहे.
नक्की काय झाले?
बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यांनी कतारमधील राजनैतिक कर्मचारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कतारच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचे काम या चार देशांनी सुरू केले आहे. सौदी अरेबियाने म्हटले आहे, की कतारने सैन्य येमेनमधील युद्धातून माघारी घ्यावे.