पीटीआय, गुरुग्राम
माजी टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. राधिका स्वतःची अकादमी चालवत नव्हती. त्याऐवजी, ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून खेळाडूंना प्रशिक्षण देत असे. वडील दीपक यादव यांना हे न आवडल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. दीपकने तिला प्रशिक्षण थांबविण्यास सांगितले होते परंतु तिने नकार दिला होता. वडील आणि मुलीमधील वादाचे हेच मुख्य कारण होते, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दीपकला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुलीने प्रशिक्षणातून कमाई करू नये असे वाटत असल्याचे आरोपीने वारंवार सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी गुरुग्राममधील सेक्टर ५७मधील सुशांत लोक परिसरातील दुमजली घरात राधिकाचे वडील दीपक यादव यांनी तिच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. दीपकने आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दीपकला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी त्याच्या पतौडी या गावीही नेले होते.
चित्रफितीचा हत्येशी संबंध नाही
राधिकाची समाजमाध्यम प्रभावक बनण्याच्या इच्छेबद्दल दीपक नाखूश होता, असे दावे केले जात आहेत. एका कलाकारासह केलेली संगीताची चित्रफीत हेच हत्येमागील कारण असल्याचे अनेकांनी सांगितले होते तथापि, सेक्टर ५६ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद कुमार यांनी ही चित्रफीत २०२३ची असल्याचे व त्याचा हत्येशी संबंध असल्याची बाब फेटाळली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार राधिकाला चार गोळ्या लागल्या होत्या. तिच्या पार्थिवावर शुक्रवारी वजीरपूर येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.