मोठी थकित कर्जे माफ करणे अवघड..

देशाला समष्टी अर्थशास्त्राच्या स्थैर्याची (मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी) गरज आहे.

रामनाथ गोएंका व्याख्यानात रघुराम राजन यांचे प्रतिपादन

बँकांनी दिलेली मोठी थकित कर्जे माफ करणे अवघड असून, ठरवून कर्ज बुडविणारे आणि कर्ज न फेडता येणारे, यांना एकाच चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. प्रत्येक थकित कर्जाचा माग काढत बसलो तर ते उद्योगांच्या जिवावर उठल्यासारखेच होईल. प्रत्येक थकित कर्ज हा अपहार असे मानून चालणार नाही. मात्र खऱ्या घोटाळ्यांचा मागोवा घेऊन समाचार घेतला पाहिजे, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी नवी दिल्लीत आयोजित रामनाथ गोएंका व्याख्यानात मांडले.

तथ्य, प्रयोगातून सिद्ध झालेली माहिती आणि व्यापक चर्चा यावर आर्थिक धोरणे आधारित असली पाहिजेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच व्यवस्थेत सुधारणा करताना त्याचा मतपेटीवरही परिणाम होणार, हेही त्यांनी सांगितले.

इंडियन एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त राजन यांचे व्याख्यान झाले. ‘इंडिया इन द ग्लोबल इकॉनॉमी’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या विविध मुद्दय़ांचा तसेच बदलत्या परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध यांचा परामर्श घेतला.

देशाला समष्टी अर्थशास्त्राच्या स्थैर्याची (मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी) गरज आहे. आपण कोणत्या उद्योगांना पाठिंबा देतो त्याबाबतीत चोखंदळ असले पाहिजे, असे सांगतानाच त्यांनी व्यवस्थेत सुधारणा करत असताना त्याचा मतपेटीवर परिणाम होणार, हेही सूचित केले. सध्याच्या मंदीच्या जागतिक परिस्थितीत विविध देश अधिकाधिक आक्रमक आर्थिक धोरणांचा अवलंब करत आहेत. या काळात भारतानेही अन्य औद्योगिक देशांबरोबर चांगले संबंध विकसित करणे गरजेचे आहे. व्यापारात घट होण्याची समस्या काही एकटय़ा भारताला भेडसावत नाही. काही काळ भारताच्या व्यापारावर विपरित परिणाम होणे अपेक्षित आहे. आपली निर्यात कमी होत आहे. पण अर्थव्यवस्थेचा पाया स्थिर करणे याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गेली सलग दोन वर्षे देशात दुष्काळसदृश स्थिती असूनही आर्थिक वाढीचा दर ७ टक्क्य़ांवर ठेवणे हे या बाबतीत मिळालेल्या यशाचेच द्योतक असल्याचे ते म्हणाले. आपले प्रयत्न इतरांच्या तुलनेत अधिक फलदायी असल्याचेही राजन यांनी नमूद केले.

रुपयाचा विनिमय दर फार चांगला किंवा खूप कमी असणे हे हितावह नसून तो नेमका आवश्यक तेवढा ठेवणे गरजेचे आहे आणि तो सध्या त्याच्या आसपास आहे यावर राजन यांनी समाधान व्यक्त केले. बदलत्या विनिमय दराचा निर्यातीवर परिणाम झालेला नसून, उत्पादकता वाढविणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि आर्थिक सुधारणा हा निर्यातवृद्धीचा मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

अन्य महत्त्वाचे मुद्दे

  • २००८-०९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ४१.७ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली होती. यंदाच्या जानेवारीपर्यंत देशात ३८.७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. २००८-०९ च्या विक्रमी पातळीपेक्षा ती केवळ ३ अब्ज डॉलरने कमी आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यास दोन महिने बाकी आहेत.
  • पूर्वीच्या तुलनेत सध्या उत्पादकतेत अपेक्षेएवढी वाढ होत नाही. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरकडून वित्तीय धोरण समितीकडे अधिकारांचे हस्तांतरण झाले ही चांगली बाब असल्याचे राजन यांनी नमूद केले.
  • केंद्र सरकारने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा महत्त्वाच्या असल्याचे राजन यांनी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raghu ram rajan commented on loan waiver issue in ramnath goenka lecture

ताज्या बातम्या