छत्तीसगढमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने येथील आदिवासींचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप करीत निवडणुकीनंतर कॉंग्रेसचे सरकार आल्यास राज्यात जादू वाटण्याइतपत बदल झाल्याचे दिसेल, असे आश्वासन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे दिले. 
छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांची कांकेरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये त्यांनी भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आम्ही आदिवासींच्या, महिलांच्या, युवकांच्या हक्कांबद्दल बोलतो. मात्र, भाजपचे नेते हे हक्क हिरावून घेण्याच्या मागे लागले आहेत. येथील महिलांसोबत काय झाले, हे सर्वज्ञात आहेच. आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील महिलांची योग्य काळजी घेतली जाईल. भाजपचे सरकार उद्योगपतींच्या हितासाठी आदिवासींच्या जमिनी बळकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे काही जण म्हणाल्याचे सांगत कुठे गेले शाळेतील शिक्षक… रुग्णालयांमध्ये डॉक्टर तरी आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. भाजप जरी शायनिंग सरकार म्हणत असले, तरी इथल्या लोकांच्या चेहऱयावर मला काळजी दिसते. महिलाही काळजीतच आहेत, असाही हल्ला त्यांनी चढविला.