पीटीआय, नवी दिल्ली
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) कार्यक्रमावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली. ‘एसआयआर’च्या नावाखाली निवडणूक आयोग भाजपला मदत करते. आयोग भाजपची ‘निवडणूक चोरी शाखा’ बनली का, असा सवाल त्यांनी केला.
बिहारमधील ‘एसआयआर’ कार्यक्रमावर अंजुम नावाची व्यक्ती यूट्यूब वाहिनीवर मालिका चालवत आहे. याबद्दल संदेश प्रसिद्ध करीत राहुल म्हणाले, ‘‘एसआयआरच्या नावाखाली भाजप मतदानाची चोरी करत आहे. जो कोणी ही चोरी उघड करेल त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात. अंजुम यांच्यावर प्रशासनाने बेगुसराय जिल्ह्यात जातीय तणाव पसरवल्याचा आरोप केला आहे.’’
राहुल यांच्या आरोपाला भाजपने प्रत्युत्तर दिले. राहुल भ्रष्टाचाराबद्दल बोलणे म्हणजे चोराने चौकीदाराची भूमिका घेण्यासारखे आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी केली. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘एसआयआर’मागील हेतूवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत.