Rahul Gandhi alleges Voter fraud By ECI : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मोठे आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाचा डेटा सादर करत राहुल गांधी यांनी एका लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणकुीत ४० लाख मतांचा घोटाळा झाल्याच्या आरोपाचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. संशयास्पद मतदार याद्या सादर करून राहुल गांधी म्हणाले, “निवडणूक आयोग यावर गप्प का?” निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत राहुल यांनी ढिगभर कथित पुरावे आणि मतदार याद्या सादर केल्या.

निवडणूक आयोगाला हाताशी धरून देशभर अशाच प्रकारे मतांची चोरी करून भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकत असल्याचा दावा राहुल यांनी यावेळी केला. बिहार निवडणुकीतही भाजपा असाच प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल यांनी यावेळी केला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला की निवडणूक आयोगाविरोधातील तुमची ही तक्रार तुम्ही कोणाकडे करणार, त्यावर कारवाई होईल यासाठी तुम्ही काय करणार? सर्वोच्च न्यालयात जाणार का? राहुल गांधी म्हणाले, “आम्ही हे सगळं जनतेसमोर सादर केलं आहे. अंपायरच (पंच) दुसऱ्या संघाकडून खेळत असल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावं लागू शकतं.”

बिहारमधील निवडणुकांवर काँग्रेस बहिष्कार घालणार का?

राहुल यांना यावेळी विचारण्यात आलं की जर इतक्या मोठ्या प्रमाणात मतचोरी करून दुसरे पक्ष जिंकत असतील तर तुम्ही आगामी बिहार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार का? यावर राहुल गांधी म्हणाले, “जर निवडणूक आयोगाने आम्हाला सध्याच्या निवडणुकीसह मागील १५ वर्षांतील निवडणुकांची इलेक्ट्रॉनिक व्होटर लिस्ट दिली नाही, तर ते एक गुन्हा करत आहेत. जर निवडणूक आयोग या गुन्ह्यात सहभागी नसेल, तर त्यांनी आम्हाला मतदार यादी द्यावी. आम्ही त्यांना एका मतदारसंघातील मतदारांची माहिती मागितली तर त्यांनी कागदांचे सात फूट उंच गठ्ठे दिले. त्यातून माहिती गोळा करायला, मतदार यादीतला घोटाळा शोधायला सहा महिने लागले. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर त्यांनी आम्हाला ही माहिती दिली.

“संपूर्ण देशभर जे काही घडतंय ते आपल्याला पाहायला हवं. हा सगळा प्रकार पाहता आपली लोकशाही अस्तित्वातच राहिलेली नाही असं वाटतंय. लोकशाही नसलेल्या देशांमध्ये आणि आपल्या देशात काय फरक उरलाय? लोकशाही राहिलीय कुठं?”

राहुल गांधी म्हणाले, “निवडणूक आयोगाने हे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे की कोणत्याही घोटाळ्याशिवाय निवडणुका पार पडतील. कारण महाराष्ट्रातील निवडणुकीत काय घडलंय हे सर्वांनाच माहीत आहे. आमचा विश्वास आहे की अशा प्रकारच्या घटना अनेक मतदारसंघांमध्ये घडल्या असतील. आता निवडणूक आयोगाने आम्ही मागितलेली माहिती आम्हाला आणि भारताच्या जनतेला द्यावी. तुम्ही जर असा घोटाळा करत असाल तर तुम्ही आपल्या स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करत आहात.”