Rahul Gandhi on Donation to Anonymous Parties in Gujarat : गुजरातमधील काही निनावी पक्षांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याचं वृत्त एका हिंदी दैनिकाने प्रसिद्ध केलं आहे. हे वृत्त समाजमाध्यमांवर शेअर करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे. “या घटनेचा तपास करून निवडणूक आयोग दोषींवर कारवाई करेल का?” असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. “निवडणूक आयोग तपास करेल की प्रतिज्ञापत्र मागेल?” असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी आयोगाला चिमटा काढला आहे.
भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतचोरी करत असल्याचे कथित पुरावे राहुल गांधी यांनी नुकतेच सादर केले होते. एका लोकसभा मतदारसंघातील संशयास्पद मतदारांची माहिती राहुल गांधी यांनी सादर केली होती. त्यानंतर देशभरातून निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त होऊ लागला होता. यावर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल यांना पत्राद्वारे उत्तर दिलं होतं. आयोगाने राहुल यांच्याकडे ‘मत चोरी’च्या दाव्यांसंबधी त्यांची स्वाक्षरी असलेले शपथपत्र (प्रतिज्ञापत्र) सादर करण्यास सांगितलं होतं. त्याच घटनेच्या संदर्भाने राहुल यांनी आज निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला चिमटा
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “गुजरातमध्ये असे काही निनावी पक्ष आहेत ज्यांची नावं कोणीच ऐकलेली नाहीत. परंतु, त्यांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा लहानमोठ्या निवडणुका लढवल्या आहेत किंवा त्यावर पैसे खर्च केले आहेत. हे हजारो कोटी रुपये कुठून आले? हे पक्ष कोण चालवतंय? हे पैसे कोण देतंय? पेसै कोणाच्या खिशात जात आहेत? निवडणूक आयोग याचा तपास करणार आहे का? निवडणूक आयोग तपास करण्याआधी प्रतित्रापत्र मागेल का? की थेट कायदाच बदलेल? जेणेकरून हा डेटा देखील लपवता येईल.”
दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार कुठल्याही प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं नाही. राहूल यांचं म्हणणं आहे की “मी जे पुरावे सादर केले आहेत तो निवडणूक आयोगाने आम्हाला पुरवलेल्या माहितीचाच भाग आहे. त्यांनी मला दिलेल्या माहितीवरच मी स्वाक्षरी करून सादर करू का?”