“फेसबुक व्हाट्सअ‍ॅप भाजपा-आरएसएसच्या ताब्यात, पसरवताहेत द्वेष आणि खोट्या बातम्या”

काय सांगतो वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट?

संग्रहित छायाचित्र (फोटो सौजन्य-पीटीआय)

देशात लोकप्रिय सोशल मीडिया असलेलं फेसबुक भारतात वादात आलं आहे. प्रसिद्ध द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या भारतातील धोरणांबाबत महत्त्वाचा वृत्तांत प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये फेसबुक सत्ताधारी भाजपाला अनुकूल भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या हा अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी भाजपा व आरएसएसवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेला वृत्तांत ट्विट केला आहे. या वृत्तांताचा हवाला देत भारतातील फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप भाजपा आणि आरएसएसच्या नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. “भारतात फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप भाजपा व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे. शेवटी अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचं सत्य उघड केलं आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी भाजपा व आरएसएसवर टीका केली आहे.

काय सांगतो वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट?

द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते. व्यावसायिक वृद्धीच्या हेतूमुळे फेसबुकनं हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपा नेत्यांच्या पोस्टवर कारवाईस नकार दिला आहे. रिपोर्टनुसार फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. “भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो,” असं दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पातळीवर फेसबुक वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul gandhi attacked bjp and rss bmh

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या