कर्नाटकात काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज ( २० मार्च ) कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केलं. तेव्हा कर्नाटकातील युवकांसाठी मोठ्या योजनांची घोषणा राहुल गांधींनी केली. तसेच, राहुल गांधींनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार देशातील सर्वात भ्रष्ट असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी सभेला संबोधित करताना म्हटलं, “भाजपा सरकार तरूणांना रोजगार देऊ शकली नाही. तरूणांना मोठ्या समस्यांना सामोर जाव लागत आहे. त्यामुळे पदव्युत्तर बेरोजगार तरूणांना महिन्याला ३००० रूपये, तर डिप्लोमा करणाऱ्यांना १५०० रूपये देणार. पुढील पाच वर्षात १० लाख तरूणांना नोकरी देण्याचं आमचं लक्ष्य आहे.”
हेही वाचा :
राहुल गांधींनी कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही भाषणात उचलला. “कर्नाटकातील भाजपा सरकार देशात सर्वात भ्रष्ट आहे. राज्यात कोणतेही काम करण्यासाठी ४० टक्के कमिशन द्यावं लागते,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
हेही वाचा : तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी? अरविंद केजरीवालांचं ‘या’ सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून भाजपा करत असलेल्या गोंधळावरही राहुल गांधींनी भाष्य केलं. “भाजपा आणि संघावर बोलल्याने देशाचा अपमान होत नाही. देशात करोडो लोक राहतात याचा भाजपा आणि संघाला विसर पडला आहे. हा देश फक्त मोदी आणि भाजपाचा नाही आहे. पंतप्रधान मोदी, भाजपा आणि संघावर बोलल्याने देशाचा अपमान होत नाही. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे,” असं राहुल गांधींनी सांगितलं.