राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. संरक्षण मंत्री म्हणत आहेत की राफेल एअरक्राफ्ट खरेदीसाठी किती रक्कम देण्यात आली ते आम्ही स्पष्ट करणार नाही या गोष्टीचा अर्थच या खरेदीत घोटाळा झाला आहे असा होतो असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या खरेदीच्या व्यवहारासाठी पॅरीसला गेले होते हे सगळा देश जाणतो. ते पॅरीसला गेल्यानंतर दोन्ही देशांमध्ये होणारा खरेदीचा व्यवहार पूर्णपणे बदलला हेदेखील सगळ्यांनाच ठाऊक आहे. असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राफेल विमान खरेदी घोटाळ्याबाबत मी माझी भूमिका मंगळवारी लोकांसमोर मांडणार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर आठवड्यातील तीन दिवस आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकांना भेटणार आहेत. मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार या तिन्ही दिवशी राहुल गांधी लोकांशी संवाद साधतील. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी जे लोक वेळ घेतील त्यांना ते भेटणार आहेत. मात्र आज त्यांनी राफेल विमानांच्या खरेदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

३६ राफेल विमानांच्या खरेदीचा प्रश्न सोमवारी संसदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये या विमानांबाबत महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसारच मी या विमानांच्या किंमतीबाबत काहीही बोलू शकत नाही. गोपनियता पाळण्यासाठीच हा व्यवहार किती रुपयांचा झाला हे सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. ज्यानंतर सपा नेते नरेश अग्रवाल यांनीही या विमान खरेदी प्रकरणाची माहिती समोर आणावी असे आवाहन केले होते.