माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्व मारेक-यांची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या निर्णयावर कडाडून टीका केली. देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या आरोपींना मोकळे सोडल्यास सामान्य जनतेने कुणाकडे बघायचे, असा उद्विग्न सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला. तरीसुद्धा आपण मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारांच्या दयाअर्जाबाबत निर्णय घेण्यात सरकारने केलेल्या ११ वर्षाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे राजीव गांधीच्या मारेक-यांच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले होते. त्यानंतर तामिळनाडू राज्यसभेत बोलताना जयललिता यांनी केंद्र सरकार येत्या तीन दिवसांत निर्णय घेण्यात अपयशी ठरल्यास राज्य सरकार आपल्या हक्कांचा वापर करत राजीव गांधींच्या आरोपींची मुक्तता करणार असल्याचे सांगितले.