काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्ष नेतृत्वाला खडे बोल सुनावले आहेत. गांधी कुटुंबाने आता पक्षाच्या नेतृत्वावरुन पायउतार व्हावं आणि इतरांनी संधी द्यावी असं सांगतानाच सिब्बल यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधीवरही निशाणा साधलाय. राहुल आणि गांधी कुटुंबावर टीका करताना सिब्बल यांनी सब की काँग्रेस आणि घर की काँग्रेस असे दोन मतप्रवाह काँग्रेसमध्ये असल्याचा टोला लगावलाय. सिब्बल यांनी केलेल्या याच टिकेसंदर्भात आत संसदेमध्ये अधिवेशासाठी आलेल्या राहुल यांना प्रश्न विचारण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिब्बल यांनी नक्की काय म्हटलं?
गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं अशी मागणी करणारे सिब्बल हे पहिलेचे मोठे नेते आहेत. “गांधींनी स्वेच्छेने बाजूला व्हावं कारण त्यांनी नियुक्त केलेलं मंडळातील लोक कधीच त्यांना तुम्ही नेतृत्व सोडा असं सांगणार नाही,” असं सिब्बल म्हणालेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिब्बल यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाल्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटलं नसल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच या पराभवानंतरही काँग्रेसमधील नेत्यांनी सोनिया गांधींकडेच नेतृत्व असावं यासंदर्भातील निर्णय घेतल्याचंही आपल्याला आश्चर्य वाटलेलं नाही असंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या कार्यकारी समितीबाहेरील बऱ्याच नेत्यांची मत ही कार्यकारी समितीच्या मतांपेक्षा फार वेगळी आहेत, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय.

मला घरी काँग्रेस नकोय…
“मी सर्वांच्यावतीने बोलू शकत नाही पण पूर्णपणे माझं वैयक्तिक मत मांडायचं झाल्यास किमान मला तरी ‘सब की काँग्रेस’ असा पक्ष हवाय तर काहींना ‘घर की काँग्रेस’ हवाय. अर्थात मला ‘घर की काँग्रेस’ नकोय. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ‘सब की काँग्रेस’साठी झगडत राहील. या ‘सब की काँग्रेस’चा अर्थ केवळ एकत्र येणे हा नाहीय. तर ज्यांना देशामध्ये भाजपा नकोय अशा लोकांनी एकत्र येणे असा आहे.” असं सिब्बल म्हणालेत.

राहुल यांच्यासंदर्भातील प्रश्नावरुनही साधला निशाणा…
राहुल गांधींकडे अध्यक्षपद द्यावं अशी मागणी होत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सिब्बल यांनी यावरही स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. “काहींना वाटतं की काँग्रेस अमुक एका व्यक्तीशिवाय काहीच नाहीय. ही तीच लोक आहेत ज्यांना ‘सब की काँग्रेस’ ही ‘घर की काँग्रेस’शिवाय टिकू शकत नाही अशं वाटतं. हे एक आव्हान आहे. हे काही एखाद्या व्यक्तीविरोधातील धोरण नाहीय,” असं सिब्बल म्हणाले.

राहुल यांना प्रतिक्रिया विचारली असता…
आज संसदेच्या अधिवेशनासाठी आलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी याच टीकेवर प्रश्न विचारला. राहुल गांधी त्यांच्या कारमधून खाली उतरल्यानंतर पत्रकारांनी त्यांना, “सर कपील सिब्बल यांनी म्हटलंय की सब की काँग्रेस किंवा घर की काँग्रेस…” असं विचारलं. मात्र राहुल यांनी आपल्या हातातील फोन खिशात ठेवत पत्रकारांकडे एक कटाक्ष टाकला आणि एक शब्दही न बोलताना ते निघून गेले.

राहुल यांनी तो निर्णय कोणत्या अधिकाराने घेतला?
दरम्यान, सिब्बल यांनी याच मुलाखतीमध्ये राहुल कोणत्या अधिकाराने निर्णय घेतात असा थेट सवालही उपस्थित केलाय. “आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत असं आम्ही मानतोय कारण त्या पदावर सोनिया गांधी आहेत. राहुल गांधी पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी चिन्नी हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. पण त्यांनी तो निर्णय कोणत्या अधिकाराने घेतला? ते पक्षाचे अध्यक्ष नाहीत तरी ते सर्व निर्णय घेतात. ते आधीच डी फॅक्टो अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते लोक पुन्हा राहुल यांना का नेतृत्व करायला सांगतायत?,” असंही सिब्बल यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi evading questions on party leader kapil sibal sab ki congress ghar ki congress remark scsg
First published on: 15-03-2022 at 12:32 IST