लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी राज्य पातळीवरील नेत्यांशी पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा केली.
अखिल भारतीय काँग्रेस समितीत समावेश असलेल्या प्रत्येक राज्यातील शिष्टमंडळाशी राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रत्येक राज्यात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वाचे विषय आहेत आणि संघटनेची त्या राज्यात कितपत ताकत आहे, याचा अंदाज राहुल यांनी घेतला.
निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यावयाची याची प्रक्रिया पक्षाने सुरू केली आहे. त्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीच्या बैठका घेण्यात आल्या असून पक्षाचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी आघाडी करणे, जाहीरनामा तयार करणे आणि प्रचाराची रणनीती ठरविणे या बाबत यापूर्वीच बैठका घेण्यात आल्या असून लवकरच त्याबाबतचे निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याशी राहुल गांधी चर्चा करणार असून त्यांच्या सूचना आणि मतांचा रणनीतीत समावेश करण्यात येणार आहे.
प्रत्येक राज्यातील नेत्यांशी राहुल गांधी यांनी १५ ते ३० मिनिटे चर्चा केली असून रविवारी ही चर्चा सुरू राहणार आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत पक्षाच्या कारभाराची पद्धत बदलण्यात येणार असल्याचे संकेत दिले.