पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे दोघेही योग्य उमेदवार नसल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वॉशिंग्टन येथे व्यक्त केले.
अण्णा हजारे दोन आठवडय़ांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. गुरुवारी येथील मेरीलॅण्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पक्षावर आधारित राजकीय पद्धतीपासून स्वत: वेगळ्या ठेवणाऱ्या अण्णांनी पंतप्रधानपदाच्या थेट निवडणुकीबाबत अनुकूलता दाखविली. पक्षीय राजकारणामुळे लोकशाहीचे तसेच घटनेचे मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले.
भारतीय राज्यघटनेत राजकीय पक्षांना अधिक थारा नाही. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांना थाराच देता कामा नये, असे ७६ वर्षीय अण्णा हजारे यांनी या वेळी सांगितले.
आपला भारतीय राज्य घटनेवर पूर्ण विश्वास आहे. तर राजकीय पक्ष घटनेच्या विरोधात काम करतात. त्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती  करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे ते म्हणाले.
जोपर्यंत राजकीय पक्ष निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडत राहतील, तोपर्यंत चांगला पंतप्रधान मिळणे कठीण आहे. त्यामुळे देशातील जनतेलाच निवडीचे स्वातंत्र्य दिले तर देशाला चांगला पंतप्रधान मिळेल,असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अमेरिकेहून परतल्यानंतर अण्णा आपल्या देशव्यापी दौऱ्याला बिहारमधून पुन्हा सुरुवात करणार आहेत. तसेच केंद्र सरकारने येत्या अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर केले नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रामलीला मैदानावर निदर्शने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.