Rahul Gandhi on EAM S. Jaishankar : पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्याआधी भारताने पाकिस्तानला पूर्वसुचना दिली होती. भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात येणार असल्याचं भारताने पाकिस्तानला आधीच सांगितलं होतं, असं केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे विविध पडसाद उमटले. लोकसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर थेट टीका केली आहे. त्या टीकेवरही जयशंकर यांनी उत्तर न दिल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्या या मौनाला निंदनीय म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी आज एक्स पोस्ट केली आहे.
आपण किती भारतीय विमानं गमावली?
राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. ते म्हणाले होते, ऑपेरशनच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला कळवणं हा गुन्हा आहे. परराष्ट्र मंत्र्यांनीच जाहीर केलंय की भारत सरकारने पाकिस्तानला सांगितलं होतं. त्यांना कोणी अधिकार दिला? पाकिस्तानला कळवल्यामुळे आपण किती भारतीय विमाने गमावली? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
राहुल गांधी यांच्या या विधानावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र, भाजपाकडून राहुल गांधींवर टीका करण्यात आली. या टीकेलाही न बधता राहुल गांधी यांनी पुन्हा आपला प्रश्न लावून धरला आहे.
ते पुन्हा म्हणाले की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय आहे. मी पुन्हा विचारेन की पाकिस्तानला या हल्ल्याविषय़ी माहिती होती, त्यामुळे आपण आपले किती भारतीय विमाने गमावली आहेत? ही चूक नाहीय तर हा गुन्हा आहे. त्यामुळे देशाला खरं काय ते कळलं पाहिजे” असं राहुल गांधी म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलंय?
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर प्रारंभिक टप्प्यावर आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता, असं परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं होतं, असं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिलं आहे. ऑपरेशनच्या आधीच पाकिस्तानला माहिती दिली होती, हे वृत्त खोटं आहे. तथ्यांचं पूर्णपणे चुकीचं सादरीकरण केलं जातंय, असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.
भाजपाची टीका
राहुल गांधींच्या वक्तव्याला उत्तर देताना भाजपाने त्यांच्यावर तीव्र प्रत्युत्तर केले. पक्षाचे प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, राहुल गांधी वारंवार एस. जयशंकर यांच्या वक्तव्याचे चुकीचे वर्णन करत आहेत. “राहुल गांधी काही विशिष्ट शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसते. परराष्ट्रमंत्री परदेशात असताना ते त्यांच्यावर का टीका करत आहेत? आपले राजनैतिक मिशन परदेशात जात असताना ते असे का करत आहेत? यातून बदनामीचा वास येतो.”
एकनाथ शिंदेंनीही दिली प्रतिक्रिया
राहुल गांधी यांचा प्रश्न आपल्या जवानांवर अविश्वास दाखवणारा आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेण्याआधी सरकारने पाकिस्तानला अलर्ट का केलं? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, असा प्रश्न विचारणं म्हणजे आपल्या जवानांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हा आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबातचा मुद्दा आहे. देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करून आपल्या देशावर व आपल्या जवानांवर प्रश्न उपस्थित करणं दुर्दैवी व निंदाजनक आहे.