लोकसभेत राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्यांदाच भाषण केलं. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर जोरदार आरोप केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत आज (१ जुलै) चर्चा चालू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यानिमित्ताने आज पहिल्यांदाच भाषण केलं.

सत्ताधारी पक्षाने नोंदवले आक्षेप

राहुल गांधी भाषण करण्यास उभे राहिल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनी त्यांच्या भाषणात अनेकदा व्यत्यय आणण्याचा, त्यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी यांनी त्यांचं घणाघाती भाषण चालू ठेवलं. सरकार संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपासह एनडीएला आरसा दाखवण्याचं काम केलं. तसंच ओम बिर्लांवरही एक आरोप केला.

ओम बिर्लांना उद्देशून काय म्हणाले राहुल गांधी?

“ओम बिर्ला हे जेव्हा मला भेटले आणि माझ्याशी हस्तांदोलन केलं तेव्हा ते सरळ उभे होते. पण स्पीकर सर (ओम बिर्ला) जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा त्यांनी वाकून हात मिळवला.” राहुल गांधींनी हे वक्तव्य करताच त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या आरोपावर उत्तर दिलं.

हे पण वाचा- “परमात्मा नरेंद्र मोदींशी रोज संवाद साधतो, ते महात्मा गांधींबाबत..”, पहिल्याच भाषणात राहुल गांधींची टोलेबाजी

ओम बिर्लांचं उत्तर काय?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाचे नेते आहेत. माझी संस्कृती मला हे सांगते की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांना वाकून नमस्कार केला पाहिजे. जे आपल्या बरोबरीचे आहेत त्यांना समान वागणूक दिली पाहिजे.” असं म्हणत ओम बिर्लांनीही राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर दिलं.

राहुल गांधी आणखी काय म्हणाले?

“लोकसभेतल्या दोन महत्त्वाच्या खुर्च्यांवर दोन माणसं बसली आहेत. एक आहेत आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. तर दुसरे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी वाकून हस्तांदोलन केलं.” राहुल गांधींनी हे वाक्य उच्चारताच गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं की लोकसभेच्या अध्यक्षांवर तुम्ही कसे काय आरोप करु शकता. पण ओम बिर्लांनीच त्यांना तिखट शब्दांत थेट उत्तर दिलं. ओम बिर्लांनी उत्तर दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा उभे राहिले.

राहुल गांधी पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले..

राहुल गांधी म्हणाले आम्हाला “लोकसभा अध्यक्षांबाबत आदर आहे. या सदनात लोकसभा अध्यक्षांपेक्षा मोठं कुणीही नाही. आपण सगळ्यांनीच त्यांच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. मी देखील त्यांना वाकून आदर देईन, संपूर्ण विरोधी पक्षातल्या नेत्यांचं वर्तनही असंच असेल.” त्यानंतर ओम बिर्लांनी पुन्हा त्यांना उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओम बिर्ला म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे. तुम्ही या सदनाचे कस्टोडियन आहात. तुम्हाला कुणापुढे झुकण्याची गरज नाही.”दरम्यान, राहुल गांधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्येच उभे राहिले आणि राहुल गांधींचं भाषण मध्येच थांबवत म्हणाले, “हा विषय खूप गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं चुकीच आहे, हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा”. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपा म्हणजू पूर्ण हिंदू समाज नाही, आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही. मी मोदी, भाजपा आणि आरएसएसबाबत बोलतोय.” असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.