भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दोन चुका केल्या त्यामुळेच काश्मीरला पुढची अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या असा आरोप ६ डिसेंबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केला. सैन्य जिंकत असतानाच पंडित नेहरुंनी युद्धबंदी जाहीर केली पंजाबचा भाग ताब्यात येताच हा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला ही पंडित नेहरुंची पहिली चूक होती. तर दुसरी चूक होती ती म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडे (UN) भारत पाकिस्तान वादाचा मुद्दा घेऊन जाणं. अमित शाह यांनी हे दोन दावे केले ज्यामुळे चांगलाच गदारोळ माजला होता. या मुद्द्यावरुन आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले आहेत राहुल गांधी?

“पंडित नेहरुंनी देशासाठी आयुष्य खर्ची घातलं. अनेक वर्षे ते तुरुंगातही होते. अमित शाह यांना बहुदा इतिहास माहीत नाही. त्यांना इतिहास माहीत असेल याची मी अपेक्षाही करु शकत नाही. कारण ते कायमच इतिहास बदलण्यासाठीच प्रयत्न करताना दिसतात. हे सगळं एका महत्त्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष वळवण्यासाठी चाललं आहे. महत्वाचा मुद्दा जातनिहाय जनणगणना आहे तसंच या देशाची संपत्ती कुणाच्या हाती चालली आहे? हा मुख्य मुद्दा आहे. हा विषय यांना काढायचा नाही. पण आम्ही हा मुद्दा पुढे घेऊन जाऊ. आम्ही गरीबांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. पंतप्रधान ओबीसी आहेत पण सरकार ९० अधिकारी चालवतात. त्यापैकी तीन ओबीसी आहेत. जे ओबीसी आहेत त्यांची कार्यालयं कोपऱ्यात आहे. सरकारमध्ये ओबीसी, आदिवासींचा किती वाटा आहे? हे सांगावं. २४ तास यावरुन लक्ष वळवण्यासाठी जवाहरलाल नेहरुंचा मुद्दा आणला जातो किंवा इतर कुठला तरी मुद्दा आणला जातो.” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

आज काय घडलं?, अमित शाह काय म्हणाले?

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतील ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्टय़ा वैध असल्याचा निर्वाळा सोमवारी (११ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने एकमताने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयात काश्मीरला राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्याचबरोबर ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान, सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतही काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावर आपलं मत मांडताना गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. शाह यांनी काश्मीरबाबत फील्ड मार्शन सॅम माणेकशा यांच्या भूमिकेचाही राज्यसभेत उल्लेख केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह यांनी नेहरू मेमोरियलमध्ये उपलब्ध असलेल्या एका पुस्तकाचा दाखला देत पंडित नेहरूंवर टीका केली आहे. अमित शाह म्हणाले, “नेहरूंनी कश्मीरबाबत स्वतःच्या चुका स्वीकारल्या होत्या.” शाह यांनी तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांच्यातील बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. अमित शाह म्हणाले, १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केल्यानंतर पटेल आणि नेहरू यांची एक बैठक झाली होती. यावेळी फील्ड मार्शन सॅम माणेकशादेखील तिथे उपस्थित होते. माणेकशा यांना लोक प्रेमाने सॅम बहादूर म्हणायचे. या उच्चस्तरीय बैठकीत पटेल नेहरुंना म्हणाले, तुम्हाला काश्मीर हवं आहे की नको? काश्मीरमध्ये आपलं सैन्य पाठवण्याचा निर्णय घ्यायला तुम्हाला इतका वेळ का लागतोय? या भेटीवेळी पटेल यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नेहरूंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवलं.असं अमित शाह यांनी म्हटलं. त्यावर आता राहुल गांधींनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.